ठाणे : लोकसभा निवडणूकीत दिव्यांगांना मतदान करणे अधिकाधिक सुलभ व्हावे व त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील तिनही लोकसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांना मतदान सुलभ करण्यासाठी सुविधा पुरविणे हे आपले साऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हानिवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे केले.
दिव्यांग मतदारांना मतदान करतांना ‘सुगम्य निवडणूका’ यासंदर्भात आज संबंधित संस्था, अधिकारी, व्यक्तींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके, ठाणे मनपाचे दिलीप कानडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे श्याम एस लोदी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, मिरा भाईंदर मनपाच्या श्रीमती मंजिरी डीमेलो, तसेच अबोली रिक्षा चालक जान्हवी आवंटे, इंदू कुंजीर्, तसेच स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांना अधिकाधिक सुलभता व्हावी यासाठी अधिक लक्ष दिले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांच्यासाठीही वेगळ्या रांगा व अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर पाळणा घरेही तयार करण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना त्यांच्या मागणी नुसार वाहनाची सुविधा पुरविण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर व्हीलचेअर, जे दिव्यांग स्वतःच्या वाहनांवर येतील त्यांच्या वाहनांची स्वतंत्र पार्कींग व्यवस्था व तेथून मतदान बुथ पर्यंत व्हील चेअर, सहाय्यक आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. महापालिका हद्दीत या सेवेसाठी ‘अबोली रिक्षा’ ची सेवा घेण्याबाबत प्रशासन विचार करीत असून महिला रिक्षाचालक या दिव्यांगांची अधिक काळजी घेऊन त्यांची ने आण करतील अशी प्रशासनाची अपेक्षा असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. याशिवाय लो- फ्लोअर बसेसही शहरातून ये जा करणार आहेत. त्या ही दिव्यांगांनी हात दाखवल्यावर थांबून त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवतील असे नियोजन निवडणूक यंत्रणा करीत असून या नियोजनात सामाजिक संस्था, व्यक्तींनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.