मुंबई

किरीट सोमय्या यांचा पत्ता कट तर तिकीट भाजपचेच मनोज कोटक यांना

मुंबई :  विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कापण्यात आला असून सोमय्या यांच्याऐवजी या मतदारसंघातून मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपचे महाराष्ट्रातील अन्य सर्व उमेदवार जाहीर झाले तरी ईशान्य मुंबईचा तिढा काही संपला नव्हता. या मतदारसंघातून किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यास भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. शिवसेनेचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी तर सोमय्या यांच्या उमेदवारीला थेट आव्हान दिले होते. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार, असा इशारा राऊत यांनी दिला होता. त्यातच भाजपमधील एक गट सोमय्या यांच्यावर नाराज होता. त्यामुळेच केंद्रीय निवडणूक समितीकडे सोमय्या यांचे नाव पाठवलेले असतानाही ऐनवेळी हे नाव मागे घ्यावे लागले आहे.
सोमय्या यांच्याऐवजी या मतदारसंघातून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोटक यांनी मुंबई महापालिकेत प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून काम केले असून शिवसेनेसोबतही त्यांचा चांगला समन्वय आहे. कोटक यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील भाजप-शिवसेनेतील कलह आता शांत होईल, अशी चिन्हे आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!