डोंबिवली :- (शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलात कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार सोमवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. उमेदवारी अर्ज भरताना फोटो काढण्यासाठी यावेळी एकही पत्रकाराला आत सोडण्यास पोलिसांनी मनाई केली.पत्रकारांना जास्त महत्व देऊ नका, असे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी पोलिसांना सांगितल्याने पत्रकार संतप्त झाले. त्यामुळे या ठिकाणी पत्रकारांनी ठिय्या आंदोलन करून पोलिसांचा जाहीर निषेध केला. यावेळी आघाडी उमेदवार बाबाजी पाटील हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना त्यांच्याबरोबर आलेले राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी पत्रकारांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला.तर राष्ट्रवादीचे नेते संजीव नाईक हे आंदोलनात सहभागी झाले होते.
पत्रकारांना अश्या प्रकारे वागणूक दिल्याने पत्रकारांनी संतप्त होऊन मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी हुकुमशाही करत पत्रकारांना जास्त महत्व देऊ नका असे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. यावर पत्रकारांनी पोलिसांना जाब विचारला. ज्येष्ठ पत्रकारांना कार्यालयाबाहेर उभे राहू नका असे पोलिसांनी सांगितल्याने त्यांनान कडक उन्हात उभे राहावे लागले.काही वेळाने राष्ट्रवादीचे नेते संजीव नाईक यांनी ठाणे येथे उमेदवार अर्ज भरताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडण्यात आल्याचे सांगितले.कल्याण लोकसभा मतदार संघात हा वेगळा नियम का लावला जात असे सांगत पत्रकारांनी केलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. तर राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी सत्ताधारी हुकुमशाहीने वागत असून पत्रकारांना अश्या प्रकाराची वागणूक दिली जातेय हे चुकीचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पत्रकारांबरोबर असून या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे.