मुंबई

महाराष्ट्र सायबर कक्षाचा यू. एस. चेम्बरतर्फे भारतातील २०१९ आयपी चॅम्पियन्स म्हणून गौरव

मुंबई  (शांत्ताराम गुडेकर /मणस्वी मणवे) :   ऑनलाईन पायरसी टाळण्यासाठी तसेच, दोन्ही देशांतील संशोधन व कल्पकतेला संरक्षण देण्यासाठी यूएस व भारत कशाप्रकारे भागीदारी करू शकतात, हे पडताळून पाहण्यासाठी ‘क्रिएटिव्ह इंडिया – ऑनरिंग लेगसी, फोस्टरिंग द फ्यूचर’ ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आज यू. एस. चेम्बर ऑफ कॉमर्सच्या ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर (जीआयपीसी) आणि यू. एस. इंडिया बिझनेस काऊन्सिल (यूएसआयबीसी) यांनी संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले. मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला असून डिजिटल पायरसीला पायबंद घालण्यासाठीचे विविध उपाय, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी-आयपी हक्कांचा अवलंब करण्याच्या पद्धती व आंतरराष्ट्रीय कल्पकतेला प्रोत्साहन या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या परिषदेला यू. एस. व भारत या दोन्ही देशांतील उद्योगक्षेत्रातील प्रमुख मंडळी व अमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना मुंबईतील यू. एस. काऊन्सिल जनरल एडवर्ड कॅगन म्हणाले, ”पुढच्या वेळी तुम्ही एखादा चित्रपट पहायला जा आणि श्रेयनामावली दिसेपर्यंत थांबा. त्यातली किती नावे तुमच्या माहितीतली आहेत, ते तपासून पहा. मोठमोठ्या प्रसारमाध्यम कंपन्यांकडून तसेच, प्रसिद्ध चित्रपट कलाकारांकडूनही बौद्धिक मालमत्तेची चोरी करणारी मंडळी ही चोरी राजरोसपणे करीत असतात. म्हणूनच ही परिषद महत्वाची आहे. सर्व प्रकारच्या संहिता चोरीविरुद्ध भारतातील आमच्या मित्रपरिवारासोबत कायदे, नियम यांच्यात सुधारणा करून त्यांचा अवलंब करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना कायमच प्रयत्नशील राहणार आहे.”

यू. एस. चेम्बर ऑफ कॉमर्सच्या जीआयपीसीचे वरीष्ठ उपाध्यक्ष पॅट्रिक किलब्राइड म्हणाले, ”ऑक्टोबर २०१८ मध्ये यू. एस. चेम्बरतर्फे नवी दिल्ली येथे आयपी विषयावरील पहिल्या वार्षिक सार्वजनिक-खासगी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी दोन्ही देशांतील सरकारी व उद्योगक्षेत्र तज्ज्ञांना आम्ही एकत्र आणले व आयपी संदर्भातील भागीदारी व एकत्रित प्रकल्पांतील आव्हानांबाबत चर्चा केली. ऑनलाईन पायरसीवर उपाय शोधणे हे एक महत्वाचे एकत्रित काम बनले असून आजचे महत्वाचे चर्चासत्र हे त्याच दिशेने पुढचे पाऊल आहे.”

विशेष टिप्‍पणी देत महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्र्यांसाठी विशेष कर्तव्‍य अधिकारी कौस्‍तुभ ढवसे म्‍हणाले, ”आम्‍हाला पायरसी समस्‍येचे निराकरण करण्‍यासाठी क्षेत्र आणि महाराष्‍ट्र सायबर डिजिटल क्राइम युनिट (एमसीडीसीयू) यांच्‍यादरम्‍यानच्‍या सहयोगाचा आनंद होत आहे. महाराष्‍ट्र राज्‍य देशात व्‍यापक सायबर सुरक्षितता आणि अॅण्‍टी-आयपी थेफ्ट इकोसिस्‍टमची निर्मिती करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. आम्‍हाला यू.एस. चेम्‍बर ऑफ कामर्ससोबत सहयोगाने पायरसी व कॉपीराइट प्रोटेक्‍शनविरोधात लढताना आनंद होत आहे.”
यावेळी झालेल्या पॅनल चर्चेत यूएस व भारतातील उद्योगक्षेत्र तज्ज्ञ आणि प्रवर्तन नेत्‍यांनी चर्चा केल्या. यात महाराष्ट्र सायबर डिजिटल क्राइम युनिटचे (एमसीडीसीयू) विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग, भारतीय संगीत क्षेत्रातील अध्यक्ष व सीईओ ब्लेझ फर्नांडिस आणि साईकृष्‍ण अॅण्‍ड असोसिएट्सचे भागीदार थॉमस जॉर्ज यांचा समावेश होता.
पॅनल चर्चासत्रानंतर, संहिता मालकांचे ऑनलाईन हक्क सुरक्षित ठेवल्याबद्दल एमसीडीसीयू या दक्षिण आशियातील सर्वप्रथम खासगी-सार्वजनिक उपक्रमाला यूएस चेम्बर ऑफ कॉमर्सतर्फे २०१९ ग्लोबल आयपी चॅम्पियन पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या समुदायातील व जगातील संहितांचे संशोधन व कल्पकतेचे संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक नियमावली तयार करणाऱ्या आयपी समुदायाचा ग्लोबल आयपी चॅम्पियन पुरस्काराने बहुमान करण्यात आला आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये सादर झालेल्या एमसीडीसीयूतर्फे चौर्य संहितेचा वापर करणाऱ्या २३५ संकेतस्थळांवर चाप बसवण्यात आला असून संहिता निर्मात्यांसाठी जवळपास १२० कोटी रुपये म्हणजेच १७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम वाचवण्यात आली आहे.
एमसीडीसीयूच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना मुंबईतील महाराष्‍ट्र सायबरचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग म्हणाले, ”भारतीय संशोधक व निर्मात्यांचे काम ऑनलाईन सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काम करतो, त्यासाठी आमचा गौरव करण्यात आला आहे. आमची समिती नवीन असली, तरीही वृद्धीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि भारत व परदेशातील डिजिटल चोरीविरुद्ध लढा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहतो. आम्‍ही यू.एस. चेम्‍बर ऑफ कॉमर्सचे त्‍यांनी केलेल्‍या प्रशंसेसाठी आभार मानतो. तसेच आम्‍ही एकत्रितपणे डिजिटल पायरसीबाबत असलेल्‍या सामान्‍य धोक्‍यांचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करू.”
यूएस चेम्बर ऑफ कॉमर्सच्या यू. एस. – भारत बिझनेस कॉऊन्सिलच्या अध्यक्षा निशा बिसवाल म्हणाल्या, ”भारताला कल्पकतेचा मोठा इतिहास आणि श्रीमंत संस्कृती लाभली असून सुयोग्य सार्वजनिक धोरणासह भारत आपली ही परंपरा सुरक्षित ठेवत आहे व कल्पक कामांचे भवितव्य जतन करीत आहे. आम्‍ही कल्पकतेचे संरक्षण करण्‍याबद्दल एमसीडीसीयूच्‍या प्रयत्‍नांचे कौतुक करतो आणि अन्य राज्‍यांवर त्यांच्या कामाचा प्रभाव पडेल, अशी आम्हाला आशा आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!