भिवंडी : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या डिझेल वाहिनीतून डिझेल चोरणाऱ्या टोळीचा भिवंडीतील नारपोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील 11 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या डिझेल विक्रीची 19 लाख 46 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अटक आरोपींमध्ये चोरीचे डिझेल विकत घेणाऱ्या पेट्रोल पंप मालक व व्यापाऱ्यांचाही समावेश असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
23 मार्च 2019 रोजी भिवंडीतील ओवळी गावाजवळ असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या इंधन वाहिनीली छिद्र पाडून काही इसम व्हॉल्वला पाईप जोडून एमएच 04/ जेके – 1356 या क्रमांकाच्या टँकरमध्ये डिझेल भरत असल्याचे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे मॅनेजर प्रसेनजीत रामटेके यांनी पाहिले. रामटेक व त्यांच्या सहकाऱ्यांना पाहून चोरट्यांनी तेथून पळ काढला. मात्र त्यांच्यातील एक आरोपी जनार्दन देवराव सदावर्ते (25) हा त्यांच्या हाती लागला. सदावर्ते याला नारपोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात (गु. र.क्र. 165/19) भादंवि कलम 379, 511, 34 सह पेट्रोलियम व खनिज नळ कायदा कलम 15(4) नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान जनार्दन याने रशीद युसूफ खान, गौतम हिराजी पाटील, केशव, पांडे ऊर्फ पंडित, मकसूद यांच्या मदतीने 23 मार्च रोजी रात्री 11:27 वाजता डिझेल चोरी करत असल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले डिझेल मोहम्मद कादीर मोहम्मद इतबारी खान, गोपाल नारायण ब्राह्मणलाल, प्रमोदकुमार रमापत उपाध्यय यांच्या मदतीने रोहा, औरंगाबाद, सोलापूर येथे विकल्याचे सांगितले.
जनार्दन याने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी वरील आरोपींना अटक केली. अटक आरोरपींनी दिलेल्या माहितीनुसार चोरीचे डिझेल विकत घेणाऱ्या पेट्रोल पंप मालक शिवशंकर दुबे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 22 हजार डिझेल विक्रीचे 14 लाख 96 हजार रुपये जप्त केले. तसेच सोलापुरातील व्यापारी सलीम युसूफ शेख, गणपत विष्णू गायकवाड, नितीन ऊर्फ महेश नागनाथ तानवडे, शशिकांत वसंत रुपनर, केदारनाथ राजेंद्र यादव यांना अटक करून चोरीच्या डिझेल विक्रीचे 4 लाख 50 गजार रुपये जप्त करण्यात आले. या एकूणच करावाईदरम्यान 2 टँकर, 19 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्ड्ये, अपर पोलीस आयुक्त सत्यनारायण, परिमंडळ 2 चे उपायुक्त अंकित गोयल, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) रवींद्र वाणी, पोलीस उपनिरीक्षक माणिकराव कतुरे, पोलीस उपनिरीक्षक राहुल व्हरकटे व पथकाने केला.