बाळ सुखरूप मिळाल्याने महिलेने मानले पोलिसांचे आभार
ठाणे : 3 फेब्रुवारी 2019 रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकातून 10 महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाले होते. या मुलाचा शोध घेत असताना ठाणे गुन्हे शाखा घटक 1 च्या पथकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून 29 मार्च 2019 रोजी 2 महिन्यांच्या बाळाचेही अपहरण झाल्याचे समजले. त्यानुसार तपासी पथकाने छत्रपत्री शिवाजी टर्मिनस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात बाळाचे अपहरण करणारी बुरखाधारी महिला स्पष्ट दिसून आली. सदर महिलेचा बांधा मुंब्र्यातून 10 महिन्यांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या बुरखाधारी महिलेशी मिळताजुळता वाटला. त्या अनुषंगाने पोलीस पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान, तांत्रिक माहिती व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून अपहरण करणारी महिला नाशिक शहरात असल्याचे पोलिसांना समजले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक तात्काळ नाशिकला रवाना झाले. 14 एप्रिल 2019 रोजी नाशिक शहरातील पंचवटी येथील श्रद्धा पार्क येथे राहणाऱ्या आरोपी निलम संजय बोरा (35) या महिलेच्या पोलिसांनी मुसक्या आवळून बाळाची सुखरूप सुटका केली.
आरोपी निलम बोरा हिला (गु. र. क्र. 667/19) भादंवि कलम 363 नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी तिला छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बाळ सुखरूप परत मिळाल्याने महिलेने पोलिसांचे आभार मानले.
या अपहरणाचा गुन्हा ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्ड्ये, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग – ठाणे) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) बाजीराव भोसले, गुन्हे शाखा घटक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बावधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक (छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग) गोदंके, हवालदार सुनील जाधव, हवालदार आनंदा भिलारे, हवालदार सुनील माने, हवालदार संभाजी मोरे, पोलीस नाईक दादासाहेब पाटील, पोलीस नाईक विक्रांत कांबळे, पोलीस नाईक रिझवान सय्यद, पोलीस नाईक अजय साबळे, पोलीस शिपाई राहुल पवार, महिला पोलीस शिपाई निलम वाकचौरे, पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रदीप खर्डे, पोलीस शिपाई विजय पाटील या पथकाने उघडकीस आणला.