ठाणे : लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांना अधिकाधिक संख्येने मतदानासाठी आवाहन करण्यासाठी 28 तारखेपर्यंत विविध उपक्रम स्वीप उपक्रमाअंतर्गत जिल्हाभरात राबविण्यात येणार आहेत,अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा स्वीप उपक्रम नोडल अधिकारी रेवती गायकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ठाणे जिल्ह्यातील मतदारांना आवाहन करण्यासाठी तयार करण्यात आलेला बिबट्याचा लोगो ही पत्रकारांना दाखवण्यात आला.
या पत्रकार परिषदेस निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी ही उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती गायकर म्हणाल्या की, सर्व स्तरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा जिल्हा निवडणूक यंत्रणेचा प्रयत्न आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी 50 टक्के मतदान झाले होते. त्याची कारण मिमांसा करुन यावेळी स्वीप उपक्रमाची आखणी करण्यात आली. समाजातील महिला, पुरुष, महाविद्यालयीन विद्यार्थि विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इ. घटकांपर्यंत मतदानाचे महत्त्व आणि मतदान करण्याचे आवाहन पोहोचविण्यात आले आहे. हे करतांना वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करण्यात आला, अशी माहितीही गायकर यांनी दिली.
येत्या कालावधीत राबविण्यात येणारे स्वीप उपक्रम याप्रमाणे- दि.19 रोजी सकाळी साडेसात वाजता मॅरेथॉन स्पर्धा, या स्पर्धेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातून होईल. दि.21 रोजी सायंकाळी पाच वाजता सायकल रॅली जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात येईल. दि.22 ते 27 या कालावधीत क्षेत्रिय प्रचार केला जाईल. दि.24 रोजी बायकर्स रॅली ठाणे येथे काढण्यात येईल. दि.27 व 28 रोजी जिल्हाभरात ठिकठिकाणी प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल. या उपक्रमांद्वारे मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी आवाहन केले जाणार आहे.
यावेळी श्रीमती गायकर यांनी स्वीप उपक्रमाअंतर्गत राबविलेल्या चुनाव पाठशाला, सह्यांची मोहिम,स्टिकर्स, पोस्टर्स, पथनाट्ये, सेल्फी पॉईंट, महिला, गृहनिर्माण संस्था यांच्यामार्फत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.