चेंबूरमध्ये आयोजित शिबिरात ५६६ निरंकारी भक्तांचे रक्तदान देशभरात ८२ शिबिरांचे आयोजन १९९ युवकांनी घेतला मायनर थैलेसेमिया तपासणीचा लाभ
मुंबई, २२ एप्रिल, २०१९: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मानव एकता दिवसानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारे देशव्यापी रक्तदान अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत अंतर्गत देशातील २१ राज्यांमध्ये ८२ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी एक शिबिर संत निरंकारी सत्संग भवन, चेंबूर, मुंबई येथे रविवार, दि.२१ एप्रिल, २०१९ संपन्न झाले असून त्यामध्ये ५६६ निरंकारी भक्तांनी मोठ्या श्रद्धा भावनेने रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरात लोकमान्य टिळक (सायन) हॉस्पिटलने ३०४ युनिट, व्ही.एन.देसाई रक्तपेढीने १४२ युनिट आणि संत निरंकारी रक्तपेढीने १२० युनिट रक्त संकलित केले.
ज्ञात असावे कि मिशन द्वारे २४ एप्रिल हा दिवस “मानव एकता दिवस” म्हणून साजरा केला जातो. कारण सन १९८० मध्ये याच दिवशी मानव एकता, विश्वबंधुत्व, शांति, प्रेम आणि सत्याचे संदेशवाहक बाबा गुरबचनसिंहजी यांना याच महान मूल्यांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले होते. त्यांच्या या सर्वोच्च त्यागाच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी निरंकारी भक्त रक्तदान करतात. मिशनचे तत्कालीन प्रमुख बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी “रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नव्हे” असा उद्घोष करुन सन १९८६ मध्ये संत निरंकारी मिशनमध्ये रक्तदान अभियानाला प्रारंभ केला. त्यानंतर सातत्याने ३३ वर्षे हा प्रघात चालू असून आतापर्यंत ६०७६ रक्तदान शिबिरांमधून १०,२५,५०७ युनिट इतके रक्तदान निरंकारी भक्तांनी केले आहे. त्याबरोबरच रक्तदानाच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून हे मिशन नावारुपाला आले आहे.
चेंबूर येथील रक्तदान शिबिराबरोबरच मायनर थैलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये १९९ युवकांनी या तपासणीचा लाभ घेतला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन मिशनच्या महान भक्त तथा प्रचारिका पूज्य भगिनी सुरिंदर आहुजा जी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महिला संत समागमांच्या संदर्भात त्या हैद्राबाद येथून मुंबई येथे विशेष रुपाने आलेल्या होत्या. यावेळी संत निरंकारी मंडळाच्या प्रचार, प्रेस व पब्लिसिटी विभागाच्या समन्वयक भगिनी प्रिमल सिंह, मंडळाच्या मुंबई क्षेत्राचे प्रभारी भूपेंद्र चुघ, अतिरिक्त क्षेत्रीय प्रभारी श्रीमती सरबजीत शौक, सेवादलाचे क्षेत्रिय संचालक सर्वश्री बाबुभाई पांचाळ आणि ललीत दळवी आदि उपस्थित होते.
संत निरंकारी सेवादल आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी संयुक्तपणे या शिबिराचे व्यवस्थापन सांभाळले.
महिला संत समागम:परिवार आणि समाजाच्या गुणात्मक विकासात
आध्यात्मिक जागृतीने युक्त महिलांची भूमिका प्रशंसनीय पूज्य भगिनी प्रिमल सिंह
“परिवार व समाजाच्या गुणात्मक विकासात आध्यात्मिकदृष्ट्या जागृत महिला निभावत असलेली भूमिका प्रशंसनीय आहे.”
उक्त उद्गार संत निरंकारी मंडळाच्या प्रचार, प्रेस व पब्लिसिटी विभागाच्या समन्वयक पूज्य भगिनी प्रिमल सिंह जी यांनी व्यक्त केले. संत निरंकारी सत्संग भवन, चेंबूर, मुंबई येथे दि. २० एप्रिल रोजी आयोजित महिला संत समागमामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित महिलावर्गाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. मंडळाच्या मुंबई झोनच्या वतीने मुंबईत महिला संत समागमांच्या श्रृंखलेचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत चेंबूर, गोराई (बोरिवली), ठाणे आणि ऐरोली याठिकाणी क्षेत्रस्तरीय महिला संत समागमांचे आयोजन करण्यात आले.
त्या म्हणाल्या की, आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण महिला आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता यांसारख्या दैवी गुणांचे संस्कार रुजवू शकतात. त्यामुळे कौटुंबिक वातावरण एकोपा, प्रेम आणि सौहार्दाने भरुन जाते. अशा स्वस्थ आणि उत्तम वातावरणात वावरणारे लोक जेव्हा समाजामध्ये जाता तेव्हा तिथेही आपल्या उत्तम व्यवहाराद्वारे सामाजिक वातावरण सुंदर आणि सौहार्दपूर्ण बनविण्यात सहयोगी बनतात.
दि.२१ एप्रिल रोजी सकाळी भगिनी प्रिमल सिंह यांच्या उपस्थितीत संत निरंकारी सत्संग भवन, गोराई (बोरिवली) येथेही महिला संत समागमाचे आयोजन करण्यात आले. याठिकाणी त्यांनी प्रतिपादन केले की, एक नारी आपले माहेर आणि सासर अशा दोन परिवारांचे प्रतिनिधित्व करत असते. जर तिचे आचरण भक्तीभाव आणि मर्यादेने परिपूर्ण असून तर दोन्ही परिवारांना ती सुख देऊ शकते. निरंकारी मिशनची शिकवण नारीशक्तीला अशा सुंदर जीवनाचे वरदान देत आहे.
रांगोळीचे उदाहरण देऊन त्या म्हणाल्या की, जर रांगोळीतील रंग उत्तमप्रकारे भरले असतील तर ती रांगोळी अत्यंत सुंदर दिसते. तसेच जीवनामध्ये मानवी मूल्यांचे रंग भरुन कुटुंब आणि समाजातील वातावरण सुंदर बनविता येते.
चेंबूर आणि गोराई येथे आयोजित या दोन्ही महिला संत समागमांमध्ये प्रत्येक ठिकाणी ३००० हून अधिक महिलांनी भाग घेतला. त्यापैकी चेंबूरमध्ये नेव्ही नगर ते घाटकोपर आणि चेंबूर ते मानखुर्दपर्यंतच्या महिलांनी तर गोराई येथे विलेपार्ले ते भाईंदर परिसरातील महिलांनी भाग घेतला.
या कार्यक्रमांमध्ये महिलांनी व्याख्यान, भक्ति रचना, संपूर्ण हरदेव बाणी व संपूर्ण अवतार बाणीतील पदांचे गायन, कविता, लघुनाटिका आदि माध्यमांतून मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, भोजपुरी, मारवाड़ी आणि कुमायनि इत्यादी भाषांतून आपल्या भावना व्यक्त केल्या.
पूज्य भगिनी प्रिमल सिंह जी यांच्या उपस्थितिमध्ये २१ रोजी सायंकाळी संत निरंकारी सत्संग भवन, साठे नगर, ऐरोली येथेही एक महिला समागम संपन्न झाला ज्यामध्ये सुमारे २००० महिलांनी आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त केले.
हे सर्व संत समागम निरंकारी महिलांद्वारे चालविण्यात आले. तथापि, व्यवस्थापनामध्ये स्थानिक ब्रांच मुखीच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सेवादलाच्या स्वयंसेवकांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले.