डोंबिवली : क्राईम ब्रँचच्या कल्याण युनीटने भर वस्तीत घुसून एका कुख्यात गुंडांच्या मुसक्या बांधण्यात यश मिळवले. सिद्धार्थ उर्फ हिरालाल मोरे (28) असे या गुंडाचे नाव आहे. हा गुंड पश्चिम डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर हॉस्पिटल समोरील सिद्धार्थ नगर झोपडपट्टीत राहणारा असून विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर आहे. सिद्धार्थ उर्फ हिरालाल याच्या अटकेनंतर अटक गुंडांची संख्या सहावर पोहोचली आहे.
1 ऑक्टोबर 2018 रोजी विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरून 2 वर्षा करिता ठाणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. तरीही हा गुंड लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने सिद्धार्थनगर झोपडपट्टी जवळील लक्ष्मीकांत देशी बार समोर येणार असल्याची खबर कल्याण क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना बातमी मिळाली होती. त्यानुसार जमादार ज्योतीराम साळुंखे यांच्यासह दत्ताराम भोसले, राजेंद्र खिल्लारे, अजित राजपूत, सतीश पगारे आणि मंगेश शिर्के यांनी बुधवारी संध्याकाळपासून सिद्धार्थ नगर झोपडपट्टी परिसरात जाळे पसरले होते. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर हा गुंड लपत छपत तेथे आला. मात्र पळून जाण्याच्या अगोदरच पोलिसांनी विजेच्या चपळाईने झडप घालून या गुंडांच्या मुसक्या बांधल्या. या गुंडाला विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये कायदेशीर कारवाई करून त्याला विष्णुनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर गुंडावर विष्णुनगर पोलिस ठाण्यात घातक शास्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे, शस्त्र घेऊन फिरणे, दुखापत करणे, नागरिकांना धमकावणे, असे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे कल्याण क्राईम ब्रँचने या 5 दिवसात एकूण 6 तडीपार गुंडांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. तर गुन्हेगारी कृत्यांच्या विरोधात एकीकडे क्राईम ब्रँचने सपाटा लावला असला तरी दुसरीकडे स्थानिक पोलिस अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तडीपार गुंडांच्या आवळल्या मुसक्या ; अटक गुंडांची संख्या पोहोचली सहावर
