नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी मानले पालिका प्रशासनाचे आभार
ठाणे : ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीतील मुख्य रस्त्यावर फेरीवाले विक्रेते यांना खाद्यपदार्थ विक्रीसाठी बसण्यास मज्जाव केल्याने रमजान महिन्यात गर्दीच्या वेळीही मुंब्रातील रस्ते ट्राफिक मुक्त झाले असून ठाणे महापालिका, वाहतूक विभाग व मुंब्रा पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सदरच्या कारवाईबद्दल नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी देखील प्रशासनाचे विशेष आभार मानले.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी मुंब्रा प्रभाग समितीमध्ये विशेष मोहिम राबवून संपूर्ण परिसर फेरावाला मुक्त केला आहे.रमजान महिन्यात मुंबईमधून खाद्य पदार्थ विक्रेते मोठ्या प्रमाणात येतात. हे विक्रीते मुंब्रातील प्रमुख रस्त्यावर बसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होवून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी फेरीवाल्यांवर केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसर आता फेरीवाला मुक्त झाला असून नागरिकांना ट्राफिकमुळे मुंब्रा स्टेशन ते वाय जंक्शनला लागणारे दीड तासाचे अंतर आता 10 ते 15 मिनिटात पार करणे सोयीचे झाले आहे.
मुंब्रा प्रभाग समितीच्यावतीने हटवण्यात आलेल्या फेरीवाल्यांसाठी मित्तल ग्राऊंड व तंन्वरनगरला तात्पुरते मार्केट तयार करण्यात आले असून याठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीते बसल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूकीचा अडथळा कमी झाला आहे. बऱ्याच वेळा काही समाज कंटकांकडून विरोध होत असून देखील सहाय्यक आयुक्त श्री.आहेर यांनी ठाम भूमिका घेत फेरीवाल्यांविरुध्द कठोर कारवाई केली आहे.
मुंब्रा पोलिस ठाण्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ईफ्तार पार्टीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड व ठाणे पोलिस आयुक्त यांच्या शुभहस्ते सहाय्यक पोलिस आयुक्त श्री .धुमाळ, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, वरीष्ठ पोलिस निरिक्षक श्री .कड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.दरम्यान काल नागरी संशोधन केंद्र येथे मान्सूनपूर्व करावयाच्या कामाच्या आढावा बैठकीत देखील महापालिका आयुक्त श्री .जयस्वाल यांनी सहाय्यक आयुक्त श्री. आहेर यांचे विशेष कौतुक केले.
मुंब्रा परिसरात रमजान महिन्यात प्रमुख रस्त्यावर वाहतूकीचे अडथळे दूर झाल्याने नागरिकांनी या कारवाईचे कौतुक करत प्रशासनाचे आभार मानले आहे.