ठाणे : नवीमुंबई येथील महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानचे केंद्र प्राणीशास्त्र,पर्यावरणशास्त्राचे एक अभ्यासकेंद्र होईल. त्याचप्रमाणे मनोरंजन केंद्र व शिक्षण केंद्र असे दोन्ही बाबतीतील महत्त्वाचे केंद्र ठरेल.तसेच या प्रतिष्ठान मार्फत सुरू करण्यात आलेल्या रंगीत माशांच्या उबवणी केंद्राच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध होतील, असा विश्वास राज्याचे वन मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी आज ऐरोली येथे व्यक्त केला.
ऐरोली येथे आज जागतिक पर्यावरण दिन निमित्त महाराष्ट्र राज्य वन विभाग कांदळवन कक्ष तसेच कांदळवन प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या शोभिवंत माशांच्या उबवणी केंद्राचे उदघाटन ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मरीन मॅटर्स या व्याख्यान मालिकेचे उद्घाटन,बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी,मुंबई यांनी तयार केलेल्या बर्ड बॅण्ड मोबाईल ॲप्लिकेशनचे विमोचन आणि कांदळवन प्रतिष्ठानाला महाराष्ट्र वन विकास महामंडळाने दिलेल्या बसचा लोकार्पण सोहळाही ना.मुनगंटीवर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमास खा.राजन विचारे,आ.संदिप नाईक,आ.रमेश पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसरंक्षक वन्यजीव नितीन काकोडकर, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन.रामबाबू,कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी,राष्ट्रीय मत्स्य आनुवंशिक संसाधन ब्युरो लखनऊ डॉ.कुलदीप लाल, उप वन संरक्षक,कांदळवण कक्ष मुंबई नीनू सोमराज ,विजय चौगुल विरोधी पक्ष नेता आदी उपस्थित होते.
या प्रसंगी ना.मुनगंटीवार म्हणाले की,सिंधूदुर्ग येथे खेकडा पालनाचे केंद्र सुरु केले असून या ठिकाणी महिला रोजगार दिला आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्त होत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून ते म्हणाले की,आतंरराष्ट्रीय पर्यावरण दिवस हा पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्याचा दिवस आहे.
यावेळी खा.राजन विचारे,आ.संदिप नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी पविविध स्वंयसेवी बचतगटांना पुस्तिकेचे वाटप त्याचप्रमाणे व्याख्याते डॉ.गोल्डन क्रॉड्रेज यांचा तसेच राष्ट्रीय मत्स्य आनुवंशिक संसाधन ब्युरो लखनऊ डॉ.कुलदीप लाल यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्योती आंबेकर यांनी तर आभार प्रदर्शन कांदळवण कक्ष मुंबई नीनू सोमराज यांनी केले.