ठाणे

अभ्यासक्रमासोबत मूल्यशिक्षण महत्त्वाचे- मुख्यमंत्री फडणवीस

श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया विद्यालय उद्घाटन सोहळा

ठाणे दि. 6 (जिमाका)- सर्वोत्तम शिक्षण पद्धती, समर्पित भावनेने काम करणारा शिक्षक वृंद याबाबीवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने सिंघानिया विद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. म्हणून सिंघानिया विद्यालय हा एक ब्रॅन्ड बनला आहे. शालेय शिक्षणात अभ्यासक्रमासोबतच मूल्यशिक्षणही महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वतःचा विकास करतांना समाज आणि राष्ट्राचाही विचार विद्यार्थ्याच्या मनात रुजविला जातो, हा विचार रुजविण्याचे काम राज्यशासनाचा शिक्षण विभाग राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधून करीत आहे,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
येथील श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया विद्यालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री ना. विनोद तावडे, आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर. महापौर मिनाक्षी शिंदे, राजेश फाटक, मनपा आयुक्त संजय जयस्वाल,पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, लोकमत चे मुख्य संपादक विजय दर्डा, रेमण्ड उद्योगसमुहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, श्रीमती कल्पना सिंघानिया, श्रीमती नवाज सिंघानिया, प्राचार्य तथा संचालक रेवती श्रीनिवासन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फित कापून शाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कोनशिला अनावरण करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या वर्गांची पाहणी केली. तेथेच विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करुन मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली.

‘सर्वोत्तम भाषा’ म्हणून मराठी शिका
आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले की, राज्यात इयत्ता आठवी पर्यंत सर्व शाळांमध्ये मराठी भाषा ही सक्तीची आहे. मात्र मराठी ही केवळ सक्ती म्हणून नव्हे तर स्वेच्छेने शिकावी. मराठी ही प्राचिनतम भाषांपैकी एक असून ती अत्यंत समृद्ध भाषा आहे. सर्व विद्याशाखांमधील ज्ञान या भाषेत उपलब्ध आहे. त्यामुळे तिचा अभ्यास केल्याने आपण ज्ञानसमृद्ध होऊ या इच्छेने ही भाषा शिकावी , अशी माझी इच्छा आहे.
लोकसंख्येचे रुपांतरण मानवसंसाधनात करते ते ‘शिक्षण’

देशात 25 वर्ष पर्यंतचा वयोगटाची लोकसंख्या अधिक आहे. ही लोकसंख़्या जर चांगले शिक्षण मिळाले तरच देशाचे उत्तम मानव संसाधन म्हणून तयार होऊ शकेल. आज देशाला या लोकसंख्येला उत्तम मानव संसाधनात परावर्तित करण्याच्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शासन अभ्यासक्रमासोबतच मूल्य शिक्षण दिले जाते.
शिक्षणाच्या बाबतीत राज्य क्रमांक ‘एक’ वर आणू
त्याच बरोबर शासनाने शिक्षणा संदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या धोरणांमध्य योग्य बदल केल्याने पूर्वी महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत देशात 17 व्या क्रमांकावर असलेले आपले राज्य आज देशात तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. आणि ते लवकरच पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.

100 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार
खरे म्हणजे प्रत्येक बालकात शिक्षण घेण्याची उपजत इच्छा असते. मात्र त्यासाठी उत्तम शिक्षक,योग्य शिक्षण पद्धती, शिक्षणाच्या साधनांची आवश्यकता असते. एकदा का बालकाला शिक्षण रुपी छिन्नी हातोड्याचा स्पर्श झाला की, त्यातील सुजाण नागरिक रुपी शिल्प आपोआप साकारते. त्यासाठी आता आम्ही जिल्हा परिषद शाळांमधून डिजीटल शिक्षणाची सुरुवात केली आहे. येत्या काळात् राज्यातील 100 जिल्हा परिषद शाळा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा आमचा मानस असून तसे प्रयत्न सुरु झाले आहेत.
रोपटी आणि मुलं सोबतच वाढतील
या कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांच्या शाळेच्या लहान लहान विद्यार्थ्यांनी रोपटी भेट दिली. त्याची आठवण काढून ना. फडणवीस म्हणाले की, मुलांनी दिलेली रोपटी आठवण म्हणून जपू, ती लावून वाढवू, जश जशी मुले मोठी होतील तशी ही रोपटीही मोठी होतील, अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
या कार्यक्रमात ना. विनोद तावडे यांनी सांगितले की, शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. शिक्षणाची पद्धती आता केवळ वाचणे, ऐकणे आणि समजणे इतपत न राहू देता ती आता विश्लेषण, मूल्यमापन आणि निर्मिती या त्रिसूत्रीवर आधारलेली असावी. या विद्यालयातील विद्यार्थी नोकरी व्यवसाय म्हणून जे काही करायचे ते करेल पण तो या देशाचा एक चांगला नागरिक असेल. केवळ गुणांसाठी शिक्षण हा विचार बदलण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
ना. सुभाष देसाई, म्हणाले की, सिंघानिया स्कूलच्या राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शाळा असाव्या. प्रत्येक जिल्ह्यात रेमण्डचा एक उद्योगl आणि एक शाळा सुरु करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रत्येक विद्यालयाने प्रत्येक इयत्तेत मराठी भाषा स्वतःहून शिकवावी,असे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी गौतम सिंघानिया यांनी प्रास्ताविक करुन सिंघानिया विद्यालयांच्या कामगिरीची माहिती दिली. तसेच लोकमत चे मुख्य संपादक विजय दर्डा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य रेवती श्रीनिवासन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर विद्यालयाची विद्यार्थिनी काव्या व्यंकटेश हिने सूत्रसंचालन केले. वंदेमातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!