बंगळुरू : ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, दिग्दर्शक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचे आज बंगळुरू येथील निवासस्थानी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. गिरीश कर्नाड यांच्या निधनाने चित्रपट, नाट्य आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
गिरीश कर्नाड यांचा १९ मे १९३८ रोजी महाराष्ट्रातील माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार अशी त्यांची ओळख होती. तुघलक, नागमंडल आणि हयवदन या मराठी नाटकांचे देखील त्यांनी दिग्दर्शन केले होते.
गिरीश कर्नाड यांनी वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. हा चित्रपट एस्. एल्. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते.
कर्नाड हे १९७६-७७ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित करण्यात आले होते. हिंदुस्थानातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार १९९८ मध्ये त्यांना देण्यात आला होता. डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा ‘ ( १९८१) मध्ये त्यांची भूमिका होती. तसेच निशान्त, रत्नदीप, मनपसंत, टायगर जिंदा है इत्यादी हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या. ‘चेलुवी ‘ या त्यांच्या कन्नड चित्रपटातून सोनाली कुलकर्णीने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले.