आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नाला यश
दिवा : ( शंकर जाधव ) दिवा शहर म्हटल कि अनधिकृत बांधकाम आणि पाणी प्रश्न हे सर्वाना माहित आहे. मात्र आता या शहरातील पाणी प्रश्न कायमचा सुटणार असून नव्या जलवाहिनीसाठी १६ कोटीं मजूर झाले आहे. आमदार सुभाष भोईर यांनी दिवावासियांचा पाणी प्रश्न सुटावा म्हणून पाठपुरावा केला होता. आमदार भोईर यांच्या प्रयत्नांना यश आल्याने दिवावासीय यांचे आभार मानत आहेत.
आमदार सुभाष भोईर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कल्याणफाटा येथून एमआयडीसीच्या पाईपलाईन वरून दिवा व साबे गावाकरिता ९०० एमएम जलवाहिनी टाकण्याकरीता १६. ५० कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. दिवा गावात गेल्या कित्येक दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. येथील नागरिकांनी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठका देखील घेतल्या होत्या. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात दिवा विभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. दिवा विभागातील एन. आर.नगर, नागवाडी, शनिवार वाडा, क्रिश कॉलनी, गावदेवी मंदिर, बंदर आळी, म्हात्रे आळी, मुंब्रा देवी कॉलनी, साबे विभाग, दिवा हायस्कुल परिसर या विभागात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत आहे. ठाणे महापालिकेचा भाग असलेल्या दिवा साबे परिसरात पाण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. येथील नागरिक रेल्वेने मुंब्रा येथून पाणी आणतात. थेंब थेंब पाण्यासाठी नागरिकांना कित्येक वेळ ताटकळत रांगेत उभे राहावे लागते. सद्यस्थितीत दिवा विभागाकरिता निळजे येथून ३० द. ल. ली प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि सदर जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या उपजल वाहिन्या असल्याने तसेच आगासन रेल्वे फटकापलीकडे विकसित होत असलेला परिसर व सातत्याने वाढत असलेली पाण्याची मागणी यामुळे पुरेसा पाण्याचा दाब मिळत नाही. त्यामुळे या विभागाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुभाष भोईर यांचा सातत्याने पाठपुरावा चालू होता. याकरिता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल व अधिकारी यांच्याकडे वारंवार बैठका देखील घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयुक्तांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रस्ताव मंजूर केला आहे.
ठाणे महानगपालिकेच्या वतीने दिवा मुंब्रा हद्दीतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी रिमोडिलींग प्रकल्प हाती घेतलेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधणे व वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याकरिता जलवाहिन्या टाकणे हि कामे करण्यात येणार आहेत. तथापि झपाट्याने विकसित होत असलेल्या दिवा भागाकरिता पाण्याच्या कोट्यामध्ये वाढ होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे भविष्यात दिवा विभागाचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघणार आहे. दिवा विभागातील पाण्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल आमदार सुभाष भोईर यांनी दिवावासियांच्या वतीने आयुक्त संजीव जयस्वाल व अधिकारी वर्गाचे अभिनंदन केले आहे