मुरबाड : (गितेश पवार ) बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुकले जखमी झाले असून यातील १३ वर्षीय धाडसी बालकाने या हल्ल्यातून आपल्या छोट्या भावाचे प्राण वाचवले असल्याची पराक्रमी घटना मुरबाड तालुक्यातील करपट वाडी येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरबाड तालुक्यातील टोकावडे-वैशाखरे परिसरातील झाडघर ग्रामपंचायत हद्दीतील करपट वाडी येथे आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास नरेश काळुराम भला (१३) व हर्षद विठ्ठल भला (६) हे दोन्ही सख्खे चुलतभाऊ आपल्या कुटुंबा समवेत शेतातील काम करीत असतांना उसंत घेण्या हेतू जांभळे खाण्यासाठी गेले असता तेथील गवतात असलेल्या बिबट्याने त्या दोघांवर हल्ला केला.
सदर बिबट्याने प्रथम बेसावध असणाऱ्या नरेशवर झडप टाकली, मात्र नरेशने स्वयंस्फूर्तीने प्रतिकार करून त्याचा हल्ला मोडीत काढला. मात्र बिबट्याने तात्काळ चिमुकल्या हर्षदवर झडप मारली. झडप मारणाऱ्या बिबट्यावर धाडसी नरेशने दगडाने प्रतिहल्ला करून त्याचा हेतू मोडीत काढून आपल्या चिमुकल्या भावाचा जीव वाचवला. या झटापटीत नरेशची धाडसी आज्जी त्याच्या मदतीला धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.
या हल्ल्यात नरेश आणि हर्षद यांना पाठीवर व हातावर जखमा झाल्या असून त्यांना प्रथम टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तद्नंतर पुढील उपचारासाठी मुरबाडच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रवाना केले.
याच बिबट्याने सात-आठ दिवसांपूर्वी नजीकच्या भोईर वाडी येथे राजेंद्र चेंगले यांचा पाळीव कुत्रा तसेच डोंगर वाडी येथील एका शेतकऱ्याची बकरी फस्त केली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
याबाबत जनजागृती करण्यात येईल. तसेच सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून जवळच्या गावांमध्ये सुरक्षितते बाबत उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे वनपाल कपिल पवार यांनी सांगितले.
यापूर्वीही अशी घटना मुरबाड तालुक्यातील पळू-सोनावळे घडली असून यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडली होती. मात्र यावेळी वन विभाग याबाबत नेमकी काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या धाडसी चिमुकल्यला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे.