डोंबिवली :- ( शंकर जाधव ) १ जून २०१५ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत २७ गावे समाविष्ट होऊन चार वर्षे उलटली आहेत. मात्र या गावांतील शाळा अद्याप पालिकेत वर्ग करण्यात आल्या नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे ठाणे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी यावर आवाज उठवीत २७ गावे महापालिकेत मग गावातील शाळा जिल्हा परिषदेत कशाला ? असा प्रश्न उपस्थित करत गावांतील शाळा पालिकेत वर्ग करण्याची मागणी मुख्याधिकारी हिरालाल सोनावणे यांच्याकडे केली.शाळांसोबत आरोग्य विभाग देखील पालिकेत समाविष्ट करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.
२७ गाव जरी पालिकेत समाविष्ट झाली असली तरी २७ शाळा जिल्हा परिषदेच्या अंर्तभूत आहेत.चार वर्षापूर्वी २७ गावे पालिकेत समाविष्ट झाली असली तरी या गावातील शाळा पालिकेकडे वर्ग करण्यात आल्या नाहीत. वास्तविक गावांतील विकास कामांचची जबाबदारी ज्याप्रमाणे पालिका प्रशासनावर आहे त्याप्रमाणे या गावातील शाळांची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे.यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदर विषयावर चर्चा सुरु असताना शिवसेनेचे ठाणे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी २७ गावातील शाळांचा भार जिल्हा परिषदेने का सोसावा ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याला उत्तर देताना मुख्याधिकारी हिरालाल सोनावणे यांनी २७ गावातील शाळा पालिकेकडे वर्ग करण्याबाबतची मागणी राज्यशासनाकडे केली असल्याचे सांगितले. दरम्यान सदस्य पाटील यांनी २७ गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी यावर्षी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले.पालिकेने २७ गावांत मुलभूत सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे २७ गावांतील बराचसा भाग एमएमआरडीएकडे अंतर्भूत करण्यात आला आहे. २७ गावातील कर पालिका आकारत असून आरोग्य आणि शिक्षण सारख्या नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या महत्वाच्या सुविधा चार वर्षानंतर देखील पालिकेकडे समाविष्ट न केल्याने शिक्षकांना आरोग्य किंवा शिक्षण खात्यातील विभागातील निधी, कर्मचाऱ्यांचे वेतन यापासून वंचित राहावे लागत आहे.त्यामुळे २७ गावातील रहिवाश्यांना कर देऊ सूद्धा आरोग्य किंवा शिक्षण सोयीला वंचित राहावे लागत असल्याने गावकरी वैतागले आहेत.