मुंबई : ठाणे जिल्ह्यातील दिवा, शिळ, देसाई व मुंब्रा, कळवा विभागामध्ये विद्युत वितरण व्यवस्थेचे खाजगीकरण करून टोरंट पॉवर कंपनीला महावितरणचा ठेका देण्यात येणार होता. त्याविरोधात जन आंदोलन उभारून मोर्चा, उपोषण करून टोरंट पॉवर कंपनीला रोखण्यात आले. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन टोरंट पॉवर कंपनीला स्थगिती देऊन महावितरण मार्फतच विद्युत व्यवस्थेचे कामकाज चालविण्यात येत आहे. तरीही टोरंट पॉवर कंपनीचा ठेका कायम स्वरूपी रद्द करण्यात यावा याकरिता आमदार सुभाष भोईर यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली त्यावेळी ऊर्जा मंत्र्यानी प्रादेशिक संचालकांना लोकप्रतिनिधींच्या तसेच जनतेच्या निवेदनावर सुनावणी घेऊन शासनास अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत टोरंट पॉवर कंपनीला स्थगिती देण्यात आली आहे.
मुंब्रा विभागामध्ये अंदाजे ८४ हजार, दिवा – शिळ, देसाई विभागात ५६ हजार आणि कळवा विभागात सुमारे ६० हजार ग्राहक संख्या असून या विभागातील नागरिक खाजगीकरण होणार असल्याने संभ्रमात आहेत. तसेच अचानक खाजगीकरण होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. तरी सुद्धा टोरंट पॉवर कंपनी आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आहे. दिवा-शिळ, देसाई, मुंब्रा – कळवा विभागातील नागरिकांना महावितरणच्या खाजगीकरणा संबधी कोणतीही पूर्वसूचना अथवा विश्वसात न घेता केल्यास नागरिक कंपनी व प्रशासनाच्या पूर्णपणे विरोधात जाण्याच्या तयारीत असून टोरंट पॉवर कंपनीचा ठेका कायमचा रद्द करण्याची नागरिकांची मागणी आहे.
याकरिता आमदार सुभाष भोईर यांनी ऊर्जा मंत्र्यांची भेट घेऊन टोरंट पॉवर कंपनी कायम स्वरूपी हटविण्याची मागणी केली.
टोरंट पॉवर कंपनीला स्थगिती…. आमदार सुभाष भोईर यांनी घेतली ऊर्जा मंत्र्यांची भेट
