कारवाईदरम्यान पोलीस पथकावर तुफान दगडफेक
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील अंबिवली रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या ईराणी वस्तीत घुसून तोतया पोलिसाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही धडाकेबाज कारवाई साकीनाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी पोलीस पथकासह केली. मात्र यावेळी ईराणी वस्तीतील लोकांनी पोलिसांच्या पथकावर तुफान दगडफेक केली. मात्र त्या परिस्थितीवर मात करून साकीनाका पोलिसांच्या पथकाने तोतया पोलिसाच्या मुसक्या आवळल्या. त्या तोतया पोलिसाला न्यायलयात हजर केले असता 5 जुलै 2019 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिली.
मुंबईसह उपनगरात ईराणी टोळीने हौदास घातला आहे. ही टोळी खास करून वयोवृद्धांना व महिलांना टारगेट करत आहे. या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार शोधमोहीम सुरू असताना साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना ईराणी टोळीतील 3 भामट्यांची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे साकीनाका पोलीस ठाण्यातील 15 पोलिसांचे पथक (अधिकारी व अंमलदार) व स्थानिक खडकपाडा पोलीस ठाण्याचे चार-पाच पोलीस अंबिवलीतील ईराणी वस्तीत दाखल झाले. पोलीस आल्याची भणक लागताच ईराणी वस्तीतील नागरिकांनी पोलीस पथकावर बेछुट दगडफेक केली. मात्र या परिस्थितीला तब्बल अर्धा तास सामोरे जाऊन पोलिसांनी मोठ्या शिताफीने जाफर अली आरीफ अली सय्यद (35) याच्या मुसक्या आवळून मुंबईत आणले.
सय्यद याने साकीनाका परिसरात पोलीस असल्याचे सांगून नागरिकांना फूस लावली होती. पुढे घडबड झाली आहे, मी पोलीस आहे, तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा, असे सांगून सय्यद याने महिला व वृद्धांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांचे दागिने पळवले होते. या गुन्ह्याप्रकरणी (गु. र. क्र 487/19) भादंवि कलम 420, 34 नुसार सय्यगद याला अटक करण्यात आली आहे.
ही धडाकेबाज कारवाई उपायुक्त (अतिरिक्त भार) संग्रामसिंग निशानदार, सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि संदीप साळुंखे, पोउनि राजेश जागडे, पोउनि साळवे व अंमलदारांनी स्थानिक खडकपाडा पोलिसांच्या सहकार्याने केली.