महाराष्ट्र

तिवरे धरणफुटीबाबत एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई – जलसंपदामंत्री गिरीष महाजन

तिवरे गावातील २३ जण वाहून गेले;  ११ मृतदेह शोधण्यात यश,एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यातNDRF ला यश

रत्नागिरी दि.03:- तिवरे येथे धरण फुटून 23 जणांचा मृत्यू झाला ही घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.  ज्यांची घरे वाहून गेली आहेत,  त्यांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून दिली जातील,  असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आज कामथे येथे केले.  सोबतच यातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे, असेही सांगितले.

काल रात्री साडेनऊच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या  समोरील बाजूस असणाऱ्या एका वाडीतील सुमारे पंधरा घरे वाहून गेली.  यात 24जण बेपत्ता असल्याचे सुरुवातीला कळले होते तथापि एनडीआरएफच्या बचाव पथकाने कृती करत एका व्यक्तीचा जीव वाचवला. त्याला उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.  जलसंपदामंत्री श्री. महाजन आणि गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणीदेखील केली. तत्पूर्वी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली व माहिती जाणून घेतली.   यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,  यामध्ये ज्यांची घरे नष्ट झाली आहेत, अशा सर्वांची व्यवस्था सध्या एका शाळेत करण्यात आली आहे.  त्यांना चांगल्या पद्धतीची मजबूत घरे चार महिन्यांच्या आत बांधून देण्याच्या सूचना मी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिल्या आहेत,  असे ते म्हणाले.

काल रात्री ही घटना घडल्यानंतर रात्रीपासूनच सर्व अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले होते. शक्य  त्या पद्धतीने जीव वाचवता येईल अशा वाहून गेलेल्या व्यक्ती शोधण्याचे काम चालू होते त्यानंतर आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील पथक या मदत कार्यात सहभागी झाले.   त्यानंतर मदत कार्याने वेग घेतला तथापि संपूर्ण खडकाळ व मोठ्या दगडाची नदी असणाऱ्या या पात्रात होडी व इतर साधने जाणे शक्य नव्हते त्यामुळे प्रत्यक्ष नदीपात्रात न फिरता मृतदेहांचा शोध सुरू झाला.   हे धरण सुमारे वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते.  सातारा जिल्ह्यात धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने हे धरण फुटल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे.

याबाबत बोलताना जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले की,या धरणातील गळती होत आहे अशी वारंवार तक्रार येत असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत व संबंधितांवर कारवाई निश्चितपणे केली जाईल.   या कार्यात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल हे काल रात्रीपासूनच घटनास्थळावर पोहोचले होते.  या ठिकाणी ज्यांची घरे वाहून गेली आहेत परंतु विविध जीव वाचवण्यात यश आले, अशा सर्वांची व्यवस्था याच गावालगत असणाऱ्या एका शाळेत करण्यात आली आहे. जखमी व्यक्तींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

बेपत्ता व्यक्तींची यादी

अनंत हरिभाऊ चव्हाण (६३),अनिता अनंत चव्हाण (५८),रणजित अनंत चव्हाण (१५),ऋतुजा अनंत चव्हाण (२५), दूर्वा रणजित चव्हाण (दीड वर्ष),आत्माराम धोंडू चव्हाण (७५),लक्ष्मी आत्माराम चव्हाण (७२),नंदाराम महादेव चव्हाण (६५),पांडुरंग धोंडू चव्हाण (५०), रवींद्र तुकाराम चव्हाण (५०), रेश्मा रवींद्र चव्हाण (४५), दशरथ रवींद्र चव्हाण (२०), वैष्णवी रवींद्र चव्हाण (१८),अनुसिया सीताराम चव्हाण (७०),चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५),शारदा बळीराम चव्हाण (४८),संदेश विश्वास धाडवे (१८), सुशील विश्वास धाडवे (४८), रणजित काजवे (३०), राकेश घाणेकर(३०).   आतापर्यंत ११ मृतदेह सापडले आहेत. बळीराम कृष्णा चव्हाण या व्यक्तीला वाचविण्यात यश आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!