कल्याण :- ( शंकर जाधव ) कल्याण परिमंडळ -३ हद्दीतील सात पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांतील आरोपींकडून हस्तगत केलेल्या मुद्देमालाचे वितरण त्यांच्या मालकांना परत देण्याचा कार्यक्रम डोंबिवलीतील ठाकूर सभागृहात मंगळवारी पार पडला.
यावेळी डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप राऊत, अनिल पोवार यांच्या हस्ते मुद्देमालांचे वितरण करण्यात आले. ७८ गुन्ह्यांमधील १ किलो, ७ रिक्षा सोन्याच्या चेन, दागिने, १२५ मोबाईल, ११ लाखांची रोकड, ३४ दुचाक्या, आदी मुद्देमालांचा यात समावेश होता. यावेळी अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे म्हणाले, प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातला पोलिसच आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली तर घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण येऊ शकते. गुन्ह्याची योग्य माहिती दिली तरच पोलिस तपास करू शकतात. त्यासाठी माहिती अचूक दिली पाहिजे. नागरिक माहिती देणार तेव्हाच किचकट गुन्हे उघडकीस येण्यास पोलिसांना मदत होते. मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक जरी असला तरी तो शरीराचाही भाग असतो. कल्याण-डोंबिवलीतून ८० लाखांचा मुद्देमाल परत केला. मात्र पुन्हा अशी घटना आपल्या बाबतीत घडणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. ६५-७० लाखाच्या सुरक्षेसाठी आपण क्षुल्लक खर्च करतो. त्यात कंजूशी केल्यास धोका निर्माण होऊ शकतो. अशीच परिस्थिती वाहनांच्या बाबतीत असू शकते. त्यामुळे नागरकांनी काळजी घेतली पाहिजे, असेही आवाहन कराळे यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनीही उपस्थितांना संबोधित केले.