मुंबई, दि. 08 : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्य संस्थेतर्फे येत्या शुक्रवारी (12 जुलै 2019 रोजी) स्काऊट गाईड पॅव्हिलियन, शिवाजी पार्क, दादर येथे राज्य पुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र प्रदान समारोह राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यासोबतच बार टू मेडल ऑफ मेरीट पुरस्कारांचे व प्रा.टी.पी.महाले जीवनगौरव पुरस्काराचेही वितरण होणार आहे.
स्काऊट गाईड अभ्यासक्रमातील राज्य पुरस्कार हा राज्यस्तरावरील सर्वोच्च पुरस्कार आहे. 10 ते 18 वयोगटातील मुले व मुली स्काऊट गाईड पथकामध्ये नोंदणी करुन अभ्यासक्रम सुरु करु शकतात. प्रवेश, प्रथम सोपान, द्वितीय सोपान, तृतीय सोपान हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर राज्य पुरस्काराचा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. प्रवेश ते तृतीय सोपान यांच्या चाचण्या जिल्हास्तरावर आयोजित केल्या जातात. राज्यपुरस्काराची चाचणी राज्यस्तरावर राज्य संघटन आयुक्त (स्काऊट) व राज्य संघटन आयुक्त (गाईड) यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात येते. सन 2016-17 व 2017-18 या दोन वर्षात यावर्षी 3881 व 3316 गाईड यांनी यशस्वीपणे या चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
महाराष्ट्रातील राज्यपुरस्कार स्काऊट गाईडची संख्या जास्त असल्याने या चाचण्या विभागनिहाय मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथील प्रशिक्षण केंद्रांवर आयोजित केल्या जातात. त्यामुळे चाचणी देण्यासाठी स्काऊट गाईडना फार दूर जावे लागत नाही. या चाचणी शिबिरांचा खर्च राज्य संस्थेतर्फे केला जातो. स्काऊट गाईडना रेल्वे व एस.टी. च्या प्रवासखर्चात 50 टक्के सवलत दिली जाते. या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या स्काऊट गाईडला राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्राप्त होते.
स्काऊट गाईड चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष निरलसपणे काम करणाऱ्या मानसेवी कार्यकर्त्यांचा सन्मान व अविरत स्काऊट गाईड चळवळीची सातत्याने सेवा करणाऱ्यांचा प्रा.बापुसाहेब टी.टी.महाले जीवनगौरव पुरस्कार देऊन राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात येणार आहे.