मनसे अंबरनाथ शहर संघटक स्वप्नील बागुल यांचे पालिकेला पत्र
अंबरनाथ दि. ०८ (नवाज अब्दुलसत्तार वणू) काही दिवसांपूर्वीच अंबरनाथ स्टेशन परिसरात रिक्षा स्टॅन्डजवळ झाड कोसळून एका रिक्षाचालकाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला होता. तसेच अंबरनाथ पुर्वेकडील वडवली विभाग येथील वीर बाजीप्रभू देशपांडे मार्ग येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडे असल्याने ती झाडे कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा अंबरनाथ नगरपालिकेने तातडीने धोकादायक झाडांची छाटणी करावी व अपघातग्रस्त परिस्थिती जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक तथा माजी सभापती आणि मनसे अंबरनाथ शहर संघटक स्वप्नील अरुण बागुल यांनी मुख्याधिकारी यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शिवाजी चौक ते लोकनगरीपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम चालू असून ह्या रस्त्यावर विविध ठिकाणी झाडे आहेत व रोटरी चौक येथेही मध्यभागी मोठे झाड असल्याने हे झाड केव्हाही रस्त्यावर पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वीर बाजीप्रभू देशपांडे मार्ग येथे आमराई असून अंबरनाथ नगरपालिका शाळा वडवली वेल्फेअर सेंटर पासून ते रोटरी क्लब रस्त्याच्या डाव्या बाजूला वनराई आहे आणि सदर ठिकाणी रस्त्याचे काम करत असताना येथील असणारी संरक्षक भिंत तोडण्यात आल्याने मातीची झीज होऊन पावसामुळे माती खाली सरकत आहे. तेव्हा येथे असणारी झाडे रस्त्यावर पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नगरपालिका प्रशासनाने या रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांची छाटणी करून संरक्षक भिंत बांधून घ्यावी. अशी मागणी मनसे अंबरनाथ शहर संघटक तथा माजी नगरसेवक स्वप्नील अरुण बागुल यांनी पालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
PHOTO GALLERY


4 Attachments