डोंबिवली : ( शंकर जाधव ) पालिका प्रशासनाचा बेजाबदारपणा आणि सत्ताधाऱ्यांची दुर्लक्षितपणामुळे डोंबिवलीतील काही प्रभागातील रस्त्यावर खड्डे अजूनही बुजवले गेलेले नाही. याचा फ फटका प्रवाश्यांना बसत असून अश्या भागात जाण्यास प्रवाश्यांना डोंबिवलीतील रिक्षाचालकांची `ना-ना`ऐकावी लागत आहे.रिक्षा भाडे नाकारण्यात येत असल्याने प्रवासी वर्ग नाराज होत असले तरी या परिस्थितीला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यामुळे डोंबिवलीतील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने डोंबिवली शहरात वाहतुक कोंडी होताना दिसत आहे. त्यातच डोंबिवली पूर्व आणि पश्चिम येथील रस्त्यावर खड्डे असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.पावसाळ्यापुर्वी हे खड्डे बुजविले जातील, हा महापालिका प्रशासनाचा दावा तूर्तास फोल ठरल्याचे चित्र आहे. रस्त्यांवर मोठे खड्डे असून यामुळे पावसाळ्यात मोठ्या अपघातांची भीती व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे तर खडड्यांंमुळे रिक्षाचालकही भाडे आकारण्यास नकार देताना दिसून येत आहेत. कल्याण-डोंबिवली शहरातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तब्बल कोटी रुपयांचा निधी दरवर्षी मंजूर करण्यात येतो. दरवर्षी पावसाळ्यात ही शहरे खड्डेमय होत असतात.पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचले की खड्डय़ांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. यामुळे अपघात घडण्याची भीती असते. त्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. येथील, डोंबिवली पूर्व येथील सूनील नगर, पांडूरंगवाडी, संगीतावाडी, मानपाडा रस्ता,गांधी नगर, इंदिरा चौक, डोंबिवली पश्चिम येथील द्वारका उपहारगृहासमोर, गोमांतक बेकरी, सुभाष रोड, नवापाडा, कर्वे रोड, उमेशनगर या रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावातील रस्त्याची अवस्था पाहून रिक्षाचालकांनी डोक्यावर हातच ठेवले आहे.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे.