कल्याण : कल्याण शहराच्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून याच वाहतूक कोंडीत अंतयात्रा अडकल्याचा दुर्दैवी प्रकार घडला. गेल्या वर्षभरापासून कल्याणचा जुना पत्रीपूल वाहतूकी साठी बंद ठेवून नंतर पाडण्यात आला. या पुलावरची वाहतूक बाजूच्या पुलावरून वळवली असल्याने या परिसरात नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. अशाच प्रकारे आज दुपारी वाहतूक कोंडी झालेली असताना कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथून निघालेली अंतयात्रा पत्रीपूल येथे वाहतूक कोंडीत अडकली होती. त्यामुळे कल्याणमधील नागरिकांना मरणानंतरही मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
कल्याण सूचक नाका परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचे सकाळी १० वाजता निधन झाले. दुपारी दोनच्या सुमारास त्यांची अंतयात्रा सूचक नाका येथून कल्याण पश्चिमेतील बैल बाजार स्मशानभूमीत जाण्यासाठी निघाली मात्र अडीच वाजण्याच्या सुमारास पत्रीपूल येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याने वाहतूक कोंडीत अडकली. या वाहनांच्या गर्दीतून मार्ग कसा काढायचा असा सवाल यावेळी अंतयात्रेतील लोकांना पडला. अखेर या वाहनांच्या गर्दीतून वाट काढत मोठी तारेवरची कसरत करत बैल बाजार स्मशानभूमी या नागरिकांनी गाठली. या प्रकारामुळे नागरिक चांगलाच संताप व्यक्त करत असून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा नागरिकांच्या समस्या सोडविण्यात अपयशी पडल्याची चर्चा रंगली आहे.
कल्याण पूर्वेत केवळ एकच स्मशानभूमी असून ती देखील विठ्ठलवाडी स्टेशन जवळ असल्याने सूचकनाका, चक्की नाका, मलंगरोड नेतिवली आदी ठिकाणच्या नागरिकांना कल्याण पश्चिमेतील बैलबाजार स्मशानभूमी गाठावी लागते. त्यामुळे कल्याण पूर्वेतील स्मशानभूमीचा देखील प्रश्न ऐरणीवर आला आहे.