डोंबिवली :- ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवलीतील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कंट्रोल करण्यास अडचणी येत आहेत. मात्र वाहतूक कोंडीमुळे वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे.पोलीस यंत्रणा आपले काम चोख बजावत असून गुन्हेगारांवर पोलिसांची नजर असल्याचे कल्याण परिमंडळ-३ चे उपायुक्त विवेक पानसरे यांनी डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात सांगितले.
डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी रामनगर पोलीस ठाण्यात कल्याण परिमंडळ-३ चे उपायुक्त विवेक पानसरे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपायुक्त पानसरे यांनी सुरुवातीला संघाचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांचे कौतुक करत त्यांच्या प्रयत्नाने वार्तापालाचे आयोजन केल्याचे सांगितले.पानसरे यांनी कल्याण-डोंबिवलीतील गुन्ह्यांच्या प्रमाणात नियंत्रण आले असून गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे सांगितले. पानसरे पुढे म्हणाले, शिक्षा भोगून आलेल्या गुन्हेगारांचा समाजावर परिमाण होऊ नये आणि त्याने पुन्हा समाजात उपद्रव माजू नये म्हणून अश्या गुन्हेगारांना आपल्या हद्दीतून कसे बाहेर काढता यासाठी पोलीस लक्ष ठेऊन आहेत.तसेच नवीन गुन्हेगारांची यादी पोलिसांकडे तयार असून त्यावर काम सुरु आहे. गुन्हे होऊ नये होण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलिसांची पथके तयार केली आहेत. मात्र चोरींच्या घटना वाढत असून नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे.सोसायट्यांच्या आवारात आणि समोर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यास पोलिसांना मदत होते.कल्याण –डोंबिवलीतील वाढत्या लोकसंख्येनुसार पोलीस चौकीची मागणी होत असल्याबाबत पत्रकारांनी पानसरे यांना विचारले असता त्यांनी लवकरच पोलीस चौकीची होणार असल्याचे सांगितले.एखाद्या गुन्ह्याच्या तपासात राजकीय नेतेमंडळींचा आणि पदाधिकाऱ्यांचा दबाव येतो का असे विचारल्यावर पानसरे यांनी अश्या प्रकारचा कोणताही दबाव पोलिसांवर आजवर आला नाही आणि यापुढेही येणार नाही असे ठामपणे सांगितले. यावेळी डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष विकास काटदरे आणि कार्याध्यक्ष श्रीराम कांदू यांनी स्वागत केले. मुरलीधर भवर यांनी प्रस्तावना केली तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी शंकर जाधव यांनी सांभाळली.
दावडी आणि काटईला दोन नवीन पोलीस ठाणे स्थापन होणार…
डोंबिवली शहराची लोकसंख्या १५ लाखाच्या पुढे गेली असून विष्णूनगर, रामनगर, टिळकनगर आणि मानपाडा पोलीस ठाणे आहे. मात्र आता वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शासनाने मानपाडा पोलीस ठाण्याचे विभाजन करून दावडी आणि काटईला असे दोन नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कल्याण परिमंडळ-३ चे उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.