मुंबई

ठाणे विकास प्रकल्पांबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा

ठाणे विकास प्रकल्पांबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा

मुंबई, : ठाणे विकास प्रकल्पाबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बुधवारी मंत्रालयात घेतली. यावेळी ठाण्याच्या महत्त्वपूर्ण अशा कोस्टल रोड, गायमुख ते खारबाव पूल, दिवा आगासन रस्ता, मनोरुग्णालयाचे आरक्षण, क्लस्टर योजनांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. ही विकासकामे जलद गतीने करण्यात यावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री.शिंदे यांनी संबंधितांना दिले.

यावेळी ठाणे कोस्टल रोडबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. ठाणे शहराच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून शहरातील वाहतुकीची कोंडी दूर होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी तात्काळ होणे गरजेचे आहे, असे सांगतानाच मुंबईच्या कोस्टल रोडच्या धर्तीवर ठाणे कोस्टल रोड विकसित करावा यासंदर्भात सर्व शक्यता तपासून पाहण्याच्या सूचना श्री.शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे महापालिकेने गायमुख ते खारबाव पुलाबाबत प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सादर केला आहे. तो संबंधित यंत्रणेने शासनाकडे तातडीने सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिले.

ठाणे रेल्वे स्थानकालगतच्या बस स्थानकाला पार्किंगसह जागा उपलब्ध करुन द्यावी व तेथे आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. महापालिकेने संबंधित आराखडे राज्य परिवहन महामंडळाचे अभिप्राय घेऊन अंतिम करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. कोपरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवासस्थानांचा पुनर्विकास करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. ठाणे महापालिकेने आराखडे सादर केले असून आठ दिवसांच्या आत संबंधित विभागांकडून ते मंजूर करुन घ्यावेत, असे निर्देश श्री.शिंदे यांनी यावेळी दिले.

ठाण्याच्या आकृतीबंधाला मान्यता देतानाच त्यासंदर्भात शासनाकडे आठ दिवसांत खुलासे सादर करावे,असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. दिवा आगासन रस्त्याबाबतचा प्रस्ताव एमएमआरडीएने मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीस पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने कार्यवाही करावी, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले. नवीन ठाणेअंतर्गत महापालिकेच्या हद्दीत ग्रोथ सेंटरचे नियोजन ठाणे महापालिकेने करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मनोरुग्णालयाचे आरक्षण कायम ठेवतानाच टीडीआरला प्राधान्यक्रम देण्याचे यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. क्लस्टर योजना राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरिता सकारात्मक भूमिका घेण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचना यावेळी दिल्या.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, एमएमआरडीएचे सह आयुक्त सोनीया सेठी, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी भिवंडी शिळफाटा रस्ता रुंदीकरणाबाबत चर्चा झाली. भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याचे सहा पदरी रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरु आहे. या महामार्गाच्या कामासंदर्भात येणाऱ्या अडचणींवर तातडीने मार्ग काढून रुंदीकरणाचे काम कालबद्ध रितीने पूर्ण करावे. जेणेकरुन नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास जाणवणार नाही, असे श्री.शिंदे यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!