ठाणे

अखेर १७ तासानंतर महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास , ९ गर्भवती महिलांची सुटका; एनडीआरएफ व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य

अंबरनाथ दि. २७ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
             बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार झालेला पाऊस आणि पुराचं पाणी रेल्वे रुळांवर आल्यानं “महालक्ष्मी एक्सप्रेस” बदलापूरजवळ अडकून पडली होती. पाण्याची पातळी वाढत होती म्हणून पाणी गाडीत शिरण्याची चिन्हे असल्यानं प्रवासी घाबरून गेले होते. नौदलाची आठ पथके दोन हेलिकॉप्टर्ससह मदतीसाठी पोहोचली होती. वांगणीतील रेल्वे रुळांवर दोन फुटांपेक्षाही जास्त पाणी साचल्यानं महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. या गाडीत सुमारे १२०० प्रवासी होते. रेल्वे प्रशासनानं तातडीची मदत मागितल्यानंतर मुंबईतून एनडीआरएफचे ४ चमू घटनास्थळी दाखल झाल्या असून, ८ बोटींच्या साहाय्याने प्रवाशांना बाहेर काढले. नौदलाचे ७ चमू, भारतीय हवाईदलाचे दोन हेलिकॉप्टर्स, लष्कराच्या दोन तुकड्या स्थानिक प्रशासनासह तैनात होत्या. मात्र, रस्त्यांवरही पाणी असल्यानं मदतीत अडथळे येत होती. स्थानिक सामाजिक संस्थांनाही रेल्वे प्रशासनानं मदतीसाठी आवाहन केलं होते. बदलापूर-वांगणी दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या “महालक्ष्मी एक्सप्रेस” मधील सर्व प्रवाशांची अखेर १७ तासांनंतर सुखरूप सुटका करण्यात आली असून सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. एनडीआरएफ, नौदल, हवाई दल, पोलीस यांच्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळं हे बचावकार्य अवघ्या दोन ते अडीच तासांत पार पडले.
              मुसळधार पाऊस आणि उल्हास नदीला आलेल्या पुरामुळं ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ शुक्रवारी रात्रीपासून चामटोली गावाजवळ अडकली होती. पुराचे पाणी वाढत असल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं. परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणांनी तातडीनं हालचाल करून मदत व बचावकार्याला सुरुवात केली. जिल्हाधिकारी स्वत: सकाळपासून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. एनडीआरएफच्या जवानांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास मदतकार्य करण्यास सुरू केले. त्यांना अन्य यंत्रणांबरोबरच स्थानिक नागरिकांची साथ मिळाली. त्यानंतर दुपारी सव्वादोनपर्यंत सर्व प्रवाशांना रेल्वेबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर १४ बस गाड्या व तीन टेम्पोंच्या मदतीनं त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून एनडीआरएफ, नौदल, हवाईदल, लष्कर, पोलीस, रेल्वे, स्थानिक प्रशासन या सर्वांचे या बचावकार्यासाठी आभार मानले आहेत. ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’मध्ये सुमारे १२०० प्रवासी होते, त्यात नऊ गर्भवती महिला होत्या. त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अन्य प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून तेथेच त्यांना भोजनाची देखील व्यवस्था करण्यात होती. त्यानंतर त्यांना बदलापूरला नेऊन तेथून मनमाडमार्गे कोल्हापूरला पाठवले गेले, तर महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांसाठी कल्याणहून १९ डब्ब्यांची विशेष गाडीची व्यवस्था करून त्यांना कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. यात काही प्रवाशांनी कोल्हापूर येथे जाण्यास, तर काही आपल्या घरी जाण्यास पसंत केले. सदर घटनेची पाहणी करण्याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
पालकमंत्री एकनाथ शिंदे – 
अंबरनाथ, बदलापूर, वांगणी येथील पूरपरीस्थितीची पहाणी करण्यासाठी एअरफोर्सचे २ हेलिकाँप्टर आले होते. ठाणे जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली आणि तात्काळ युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले होते. वांगणी येथे अडकलेल्या सुमारे ७०० प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि सर्व संबंधित यंत्रणाशी संपर्कात असून योग्य आदेश देण्यात आलेले आहेत. असे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 
PHOTO GALLRY

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!