उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी तहसीलदार यांच्याकडे केली मागणी
अंबरनाथ दि. ३० (नवाज अब्दुलसत्तार वणू) २६ व २७ जुलै रोजी अंबरनाथला झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पावसाचे पाणी घरात शिरून घरातील सामानाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अश्या नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ शासनाने नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी १५ हजार रुपये देऊन दिलासा द्यावा. अशी मागणी अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी तहसिलदार जयराज देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मागील आठवड्यात म्हणजेच २६ आणि २७ जुलै रोजी अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे पर्जन्यवृष्टी झाली होती. यामुळे सिद्धार्थनगर, गांधीनगर, भगतसिंग नगर, शास्त्रीनगर, स्वामीनगर आणि जुना भेंडीपाडा सारख्या रहिवासी क्षेत्रात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून त्याठिकाणच्या नागरिकांचे घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्याचप्रमाणे शास्त्रीनगर आणि स्वामीनगर येथील प्रत्येकी तीन घरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान झालेले आहे. स्वामीनगर व परिसर अधिसूचित झोपडपट्टी म्हणून घोषित आहे. या सर्व भागातील नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक शासकीय मदत म्हणून प्रत्येकी १५ हजार रुपये दिलासा म्हणून देण्यात यावा. अशी मागणी तहसिलदार जयराज देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचे उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी सांगितले.