मुंबई: भांडुप पोलीस ठाण्यात एका आरोपीचा वाढदिवस साजरा करणे पोलिसांना चांगलेच भोवले आहे. भांडुप पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर झोन सातचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी ही कारवाई केली.
भांडुप पोलिस ठाण्याच्या इमारतीत एका कक्षात 23 जुलै रोजी आयान खानचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक पोलीस अधिकारी आयानला केक भरवताना स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यानंतर अखेर चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, आयान खान हा पोलिसांचाच खबरी आहे. परंतु त्याच्यावर 2010 मध्ये मारामारी आणि अपहरण यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. अपहरणाच्या गुन्ह्यातून त्याचं नाव कमी केले तर दुसऱ्या गुन्ह्यात त्याचा समावेश नसल्यामुळे न्यायालयात बी समरी फाईल करण्यात आली होती.