डोंबिवली :- ( शंकर जाधव ) गेले काही दिवस अतिवृष्टीने हाहाकार माजला असताना परिसर जलमय झाले होते. जोरदार पावसामुळे आणि बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याने खाडी किनारी भागात मोठया प्रमाणात पूरसदृष्य परिस्थती निर्माण झाली. बफर्स झोन व सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन बांधण्यात आलेल्या बैठया चाळीमध्ये कमरेइतके पाणी शिरुन शेकडो नागरिकांचे संसार उध्वस्त झाले. मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी राज्य सरकारकडे या नागरिकांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
डोंबिवलीतील खाडी किनारी असलेल्या नवीन देवीचा पाडा,जगदंबा मंदिर,गरीबाचा वाडा,सरोवर नगर,आदि भाग खाडी किनारी असून विविध बाधकाम व्यावसायिकांनी येथे मोठया प्रमाणात बैठयाचाळी बांधल्या पण दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे घरातील फर्निचर,गाद्या,कपडे,धान्य सर्व भिजून खराब झाल्याने नागरिकांनी सर्व सामान बाहेर टाकून दिले. सध्या पाणी ओसरले असले तरी घरात चिखल झाला आहे. त्यामुळे आता रहायचे कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला होता. महापालिकेने शाळामध्ये सोय केली असली तरी ही सोय अपूर्ण पडत असल्याने नागरिकांचे संसार उघ्वस्त झाल्याने सध्या त्यांची सोय रिकाम्या इमारतीतील ब्लाॅक मध्ये केली आहे. आता पाणी ओसरले असले तरी आता नागरिकांच्या घरात चिखल झाला आहे. त्याची स्वच्छता करणे,फवारणी करणे,साथीचे आजार होऊ नये म्हणून प्रितबंधात्मक गोळ्यांचे वाटप करण्यात आले असून वैद्यकीय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी कायदा मोडून बांधकाम केले त्याच्या विरुध्द एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी होत आहे.तसेच कल्याण पूर्व वालधुनी परिसर,मुरबाड रोड, शहाड रेल्वे स्टेशन परिसर,टिटवाळा पूर्व, पश्चिम परिसर, मोहने, मोहिली पंपिंग स्टेशन या ठिकाणीहि पूरपरिस्थित निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्या परिसरात नागरिकांचे नुकसान झालेले आहे, त्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी केली आहे.