ठाणे दि १३ : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग २०१२ च्या पायाभूत सर्वेनुसार हागणदारीमुक्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भाग आता शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. नागरिकांमध्ये शौचालयाच्या वापराबाबत सकारात्मक जागृती व्हावी यासाठी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून हागणदारीमुक्त ग्रामपंचायत पडताळणीच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ करण्यात आला.
जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) अंतर्गत हागणदारीमुक्त ग्राम पंचायत पडताळणीच्या दुसऱ्या टप्प्या बाबत नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2019-2020 नियोजन, तसेच महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम राबविणे बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सातपुते म्हणाल्या की , स्वच्छता हा संस्कार असून प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येक्ष कृतीत त्याची रुजवण व्हायला हवी. स्वच्छतेमध्ये जिल्ह्याचे काम उत्तम असून दुसरा टप्यातील काम यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने काम करायला हवे.असे आवाहन त्यांनी केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) अशोक पाटील, मुख्य लेखा वित्तधिकारी गीता नागर यांनी देखील समयोजित मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता) छायादेवी शिसोदे म्हणाल्या, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील पडताळणी प्रक्रिया पुर्ण झालेल्या आहेत. हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या दुस-या टप्प्यातील पडताळणी प्रक्रिया पुर्ण करुन घेणेबाबत शासन निर्णय क्रमांक/स्वभामि-२०१९/प्र.क्र./९०/पापु-१६ दिनांक १८ जुलै २०१९ रोजीच्या शासन निर्णयाअन्वये कळविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची दुस-या टप्प्यातील पडताळणी प्रक्रिया पुर्ण करुन घेणेसाठी जिल्हास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ.लक्ष्मण पवार, कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे, कार्यकारी अभियंता ( लघु पाटबंधारे) माणिक इंदूरकर तसेच गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि स्वच्छ भारत मिशनचे सर्व अधिकार कर्मचारी उपस्थित आहेत.
प्राथमिक पडताळणी समिती गठित होणार
हागणदारीमुक्त टप्पा-२ ची प्रक्रिया पुर्ण करुन घेणेसाठी ग्रामपंचायतस्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतकरिता विस्तार अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली प्राथमिक पडताळणी समिती गठित होणार आहे. या तपासणी समितीचे कार्यक्षेत्र हे त्या ग्रामपंचायती पुरते मर्यादित राहणार आहे व यामध्ये २ ते ८ सदस्य हे कुटुंबसंख्येनुसार राहणार आहे. तसेच या समितीमध्ये केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, स्वच्छाग्रही, जलसुरक्षक इत्यादींचा समितीमध्ये समावेश असणार असल्याचे समाजशास्त्रज्ञ दत्तात्रय सोळंके यांनी सांगितले.
गांधी जयंती निमित्ताने विविध उपक्रम
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने जिल्हयात ०२ ऑक्टोबर २०१९ रोजी Incinator मशिन ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये बसवुन त्याचे उदघाटन करणे, ग्रामपंचायत क्षेत्रातील एक शोषखडयांचे शौचालय असलेल्या व खडडा पुर्ण भरलेल्या तसेच सोनखत तयार झालेल्या शौचालयाची निवड करणे, एक खडडा शौचालय असलेल्या कुटुंबांना दोन खडयाचे शौचालय बांधकाम करण्यास प्रवृत्त करावे, ग्रामपंचायस्तरावरील सफाई कर्मचारी यांना स्वच्छतेच्या बाबतीत योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हास्तरीय प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे मुल्यांकन व सहनियंत्रण तज्ञ अनिल निचिते यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिला सोनवणे तर आभार प्रदर्शन लेखाधिकारी सुधाकर जाधव यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावरील सर्व कर्मचाऱ्यानी मेहनत घेतली.