दिवा, ता. 15 ( बातमीदार) भाऊरायाला राखी बांधण्यासाठी गुरुवारी सकाळीच घराबाहेर पडलेल्या महिलांच्या रक्षणासाठी रेल्वे पोलिसांना सतर्क रहावे लागले. स्वतः सणावाराचा आनंद घेऊ न शकणार्या या रेल्वे पोलिसांना गुरूवारी ‘आम्ही दिवा रेल्वे प्रवासी संघटने’च्या उपक्रमामुळे ड्युटीवर असतानाही रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करता आला. महिला प्रवाशांनी पोलिसांच्या हाती राखी बांधली. या भगिनींना गिफ्ट म्हणून पोलिसांनीही महिलांसाठी नेहमीच ‘रक्षाबंधना’त राहू, असे वचन दिले.
मध्य रेल्वे मार्गावरील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अलिकडच्या काळात ऐरणीवर आला आहे. अनेक घटना महिला प्रवाशांच्या मनात धाकधूक निर्माण करत आहेत. अशाप्रसंगी रेल्वे पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. पोलिसदेखील अनुचित घटना रोखण्यासाठी सतर्क असतात. त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम म्हणून तसेच भविष्यातही पोलिसांनी हेच ‘रक्षाबंधना’चे व्रत जोपासावे, यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने गेली काही वर्षे रक्षाबंधन साजरे केले जात आहे. अविश्रांत लोकल सुरू ठेवणारे मोटरमन आणि रेल्वे पोलिसांना या उपक्रमांतर्गत राखी बांधली जाते. गुरुवारी दिव्यात रेल्वे पोलिसांना राख्या बांधण्यात आल्या.
पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेला सलाम म्हणून आम्ही हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून राबवित आहोत. पोलिस आमचे रक्षण करतात. ते एक खंबीर भाऊ बनूनच आमच्या रोजच्या प्रवासात साथ देतात.
– श्रावणी गावडे, पदाधिकारी, आम्ही दिवा रेल्वे प्रवासी संघ