कोकण नवी मुंबई

कोकणातील नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत – कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे

नवी मुंबई, दि.26: कोकण विभागात अतिवृष्टीमुळे 46 हजार 642 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे पूर्ण झाले असून आचारसंहितेपूर्वी नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी दिली. आज कोकण विभागीय कृषी विषयक योजनांच्या आढावा बैठकीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, विभागीय महसूल आयुक्त श्री.शिवाजीराव दौंड, विभागीय कृषी सहसंचालक श्री.विकास पाटील आदि उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले जिल्हानिहाय क्षेत्र ठाणे-7 हजार 380 हेक्टर, पालघर-6 हजार 597 हेक्टर, रायगड-21 हजार 414 हेक्टर, रत्नागिरी-1 हजार 312 हेक्टर, सिंधुदुर्ग-9 हजार 939 हेक्टर असे एकूण 46 हजार 642 हेक्टर क्षेत्र आहे.

डॉ.बोंडे म्हणाले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून एकही पात्र लाभार्थी शेतकरी सुटणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत 5 लाख 80 हजार 631 पात्र लाभार्थ्यांपैकी 4 लाख 85 हजार 541 लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून या योजनेंतर्गत तीन दिवसात 3 हजार 525 शिबीर आयोजित करून 1 हजार 562 शेतक-यांची नोंदणी करण्यात आली आहे. कोकण विभागात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व उद्योगास चालना देण्याचा शासनाचा मानस आहे. कोकण प्रदेश हा उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळा प्रदेश असून कोकणासाठी वेगळया योजना राबविण्यात येणार आहे.

डॉ.बोंडे म्हणाले की, फळबागांसाठी कोकण विभाग प्रसिध्द आहे. त्यामुळे उद्यानविद्याच्या प्रोत्साहनात्मक योजना राबविल्या जातात. हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत 2018-19 आंबा पिकाला 15 हजार 791 शेतक-यांना रुपये 1 हजार 190 लाख विमा प्राप्त, काजू पिकाला 3 हजार 463 शेतक-यांना रुपये 795 लाख विमा प्राप्त तर चिकू पिकाला 2 हजार 592 शेतक-यांना रुपये 1 हजार 562 लाख विमा प्राप्त झाला आहे. कृषी विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्या योजना प्रत्येक शेतक-यापर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासन करीत आहे. कोकण विभागात गट शेतीस चालना देण्याकरीता 55 गटांना 55 कोटीची तरतूद करण्यात आली असून 7 कोटी 43 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत 2 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असून या योजनेमध्ये सलग 10 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याची मुभा असून ठिबक सिंचन करीता 100 टक्के अनुदानर दिले जाते. कोकण विभागाकरीता ठिबक सिंचन अनिवार्य आहे. अशी माहिती डॉ.बोंडे यांनी दिली.

कोकण विभागाची कृषी विषयक योजनांबाबत आढावा बैठक

कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी कोकण कृषी विभागातील कृषी विषयक योजनांची आढावा बैठक घेतली. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, विविध नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप, पीक कर्ज वाटप, खरिप हंगाम बी-बियाणे, खते उपलब्धता, सर्व पीक विमा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना व कृषी विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचा आढावा घेतला.

यावेळी कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर व सिंधुदुर्ग या जिल्हयाचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधिकारी उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!