डोंबिवली : ( शंकर जाधव ) आज देशात वर्षाला सुमारे दोन लाख रुग्णांना डोळ्यांची गरज असून केवळ ३० ते ३५ हजार नेत्रदान केले जाते. त्यापैकी केवळ १५ ते २० हजार डोळ्यांचा प्रत्यक्ष उपयोग होतो. यामुळे आणखी सुमारे दीड लाख डोळ्यांची गरज आहे. नेत्रदानात महाराष्ट्र राज्य सहाव्या क्रमांकावर असून तेलंगणा, तामिळनाडू हे राज्य यात अग्रेसर आहेत. नेत्रदान चळवळीच्या पंधरवड्यात जनतेच्या मनापर्यंत नेत्रदानाचा संकल्प नेण्यासाठी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन विख्यात नेत्रतज्ञ डॉ. अनघा हेरूर यांनी केले.
डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना त्या पुढे म्हणाल्या, २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा देशात साजरा करण्यात येत आहे. या निमित्त या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. नेत्रदानाबद्दल नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. नेत्रदान करण्यासाठी कोणत्याही नोंदणीची गरज नाही. नातेवाईकांनी, कुटुंबीयांनी नेत्रदानाची संमती दिली तरी चालते. नेत्रदान करण्यासाठी दात्याला कुठेही नेण्याची गरज नाही. दात्याचे निधन झाल्यापासून चार ते सहा तासाच्या आत संबंधीत नेत्रतज्ञ येऊन ही क्रिया पूर्ण करून नेत्रदान होते. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी ‘हम भी करेंगे नेत्र दान’ हा संकल्प करण्याचे आवाहन केले. ठाणे जिल्ह्यात आज केवळ एकमेव आय बँक असून डोंबिवलीमध्ये अनिल आय हॉस्पिटल येथे आय बँक मिळावी यासाठी त्या प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्रदान चळवळीमध्ये आपल्या राज्याचा देशात सहावा क्रमांक असून या पंधरवड्यात राज्याला प्रथम क्रमांक मिळविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यासाठी आगामी गणेश उत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. अधिक माहितीसाठी अनिल आय हॉस्पिटल फडके रोड डोंबिवली डोंबिवली पूर्व ९७६९४८३७९६ वर संपर्क साधण्याची विनंती केली आहे.