चायना येथे झालेल्या वर्ड पोलीस गेम स्पर्धेत तीन सुवर्ण,एक रौप्य पदाची कामगिरी
ठाणे दि २६ ऑगस्ट २०१९ : ठाणे शहर पोलीस मुख्यालतील सहाय्यक पोलीस अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या स्नेहा सुनील कर्नाले यांनी नुकत्याच चायना येथे पार पडलेल्या वर्ड पोलीस गेम स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत पोलीस दलाचे नाव उंचावले आहे. त्यांनी ऍथलेटिक्समध्ये तीन सुर्वण आणि एक रौप्य पदकाची कमाई करत सुवर्ण धाव घेतली.
कर्नाले या पोलीसदलात सेवा बजावत असताना क्रीडा क्षेत्रातही त्यांनी नैपुण्य मिळवले आहे. गेली २९ वर्ष त्या विविध ऍथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होत असून स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत. चायना येथे झालेल्या या स्पर्धेत मात्तबर प्रतिस्पर्धकाना मागे टाकत त्यांनी सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्यांनी शंभर मीटर, दोनशे मीटर, चारशे मीटर आणि आठशे मीटर स्पर्धेत सहभागी होत चमकदार कामगिरी केली.
१९९० साली त्या पोलीस सेवेत कॉन्स्टेबल पदावर रुजू झाल्या. त्यानंतर खेळ आणि सेवा तसेच कुटुंब ही तिहेरी कसरत करत खेळातील सातत्य त्यांनी टिकवून ठेवले. त्यामुळे १२ राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सहभाग घेत दिमाखदार कामगिरी केली. स्नेहा यांचा मूळ पिंड कब्बडी खेळाचा आहे. त्यामुळेच पहिल्या प्रो कब्बडी स्पर्धेत मुंबईचे राजे या संघाच्या त्या महिला प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले.
आज पर्यंत त्यांनी सिंगापूर, मलेशिया, थायलंड, अमेरिका, चायना, ऑस्ट्रेलिया आदी देशातील विविध स्पर्धामध्ये सहभागी होत सुवर्ण कामगिरी केली आहे. वयाच्या ४७ व्या वर्षी देखिल नोकरी आणि खेळातील त्यांची पकड मजबूत असून आगामी काळात होणाऱ्या स्पर्धांमध्ये सुवर्णधाव घेण्यासाठी सज्ज असल्याच्या त्या सांगतात.ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मिकाला,अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यामुळे त्यांच्या खेळाला प्रोत्साहन, सहकार्य मिळत असल्याची प्रांजळ भावना त्या व्यक्त करतात.