ठाणे (प्रतिनिधी)- सरकारने महाराष्ट्रातील किल्ल्यांचे रिसॉर्ट आणि हॉटलमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने संताप आणि राग अनावर होतोय; महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर लग्न आणि पार्ट्या करण्यासाठी ते कोणाच्या बापाची जहागीर नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, शिवप्रेमी आ. जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) अशा 25 किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात. ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा आमदार आव्हाड यांनी कडाडून विरोध केला आहे.
आ. आव्हाड म्हणाले की, आमच्या पूर्वजांच्या रक्तातून लिहिला गेलेला इतिहास आहे तो! तेथील प्रत्येक दगड साक्षीदार आहे. त्या इतिहासाचा!! किल्ल्यांवरी माती जी आम्ही डोक्याला लावतो ती ऊर्जास्त्रोत आहे. जिथे मॉसाहेबांचे, शिवरायांचे, संभाजी राजांचे पाय लागले. त्या मातीवर नंगानाच होऊ देणार नाही. रायगडावर गेल्यानंतर मॉसाहेब आणि शिवरायांमधील संभाषण आम्हाला आठवतं; सिंहगडावर ‘गड आला पण सिंह गेला, हे आठवतं. प्रतापगडावर गेल्यावर अफझल खानाचा काढलेला कोथळा आणि महाराजांवर कृष्णा कुलकर्ण्याने केलेला एकमेव वार , शिवा काशीद आठवतो. हा इतिहास मराठी मातीचा, आमच्या स्वाभीमानाचा, आमच्या अस्मितेचा इतिहास आहे. त्या इतिहासाशी तुम्हाला खेळू देणार नाही. पक्ष, कार्यकर्ते, महसूल बाजूला गेलं; पण, ज्या इतिहासाने आम्हाला धडे दिले. ज्या इतिहासाने आम्हाला मार्ग दाखविला. ज्या इतिहासामुळे महाराष्ट्र जगभरात गेला. त्या इतिहासाशी खेळू देणार नाही. लग्नासाठी, पार्ट्यांसाठी तुम्ही आमचे गडकिल्ले वापरणार? हे सरकार आहे तरी काय? ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल प्रेम नाही, ज्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आदर नाही. ज्यांना गडकिल्ल्यांवर सांडलेल्या रक्ताबद्दल- बलिदानाबद्दल आदर नाही. त्यांच्या हातात हे सरकार आहे. म्हणून हे तुघलकी निण यि घेऊ शकतात. या निर्णयाला आम्हीच नाही तर तमाम मराठी माणूस ज्यांना शिवरायांच्या भूमिबद्दल प्रेम आहे; मराठी मातीबद्दल अभिमान आहे. तो प्रत्येक माणूस या निर्णयाला विरोध करेल, हा माझा विश्वास आहे.
महाराष्ट्रातील गडकिल्ले पार्ट्यांसाठी वापरायला कोणाच्या बापाची जहागीर नाही- आ. जितेंद्र आव्हाड
