ठाणे

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांनी देशाचे भवितव्य घडवावे – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

आदर्श शिक्षक पुरस्कार देवून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा सन्मान

ठाणे   :  राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील वाढलेली पटसंख्या हे त्याचे उदाहरण आहे. अशाच पद्धतीने शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडवावे, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

मो.ह. विद्यालयाच्या सभागृहात ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक दिना निमित्ताने दहा आदर्श शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, खासदार कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती वैशाली चंदे, कृषी,पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती किशोर जाधव, समाज कल्याण समिती सभापती संगीता गांगड, महिला व बालकल्याण समिती सभापती सपना भोईर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, शिक्षणाधिकारी संगीता भागवत तसेच जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण हा प्रगतीचा पाया आहे. शिक्षणामध्ये क्रांती घडविण्याची ताकद आहे, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना कायम मदतीचा हात देत असून, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

ज्या क्षेत्रात विद्यार्थ्याला गती असेल, त्या क्षेत्रात विद्यार्थ्याचा नावलौकिक कसा होईल, याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे. आदर्श शिक्षकांप्रमाणेच आदर्श शाळांसाठीही स्पर्धा घ्यावी, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले. ग्रामीण भागातील शाळांना वीज बिलांचा वाढता खर्च भेडसावतो. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सौरऊर्जेवरील प्रकल्प उपलब्ध केल्यास शाळांना सुविधा होईल. त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील यांनी दिली.

ज्यांनी शिक्षण क्षेत्रात केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षण न देता मुलांना ज्ञानरचनावादी,  कृतीयुक्त पद्धत तसेच मुलांच्या  कलाने शिकवले , प्रयोगशील काम केले. त्या प्रयोगशील शिक्षकांचा हा सन्मान असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेतील शाळांच्या कायापालटाचा निर्धार करुन शिक्षण समितीने कार्याला सुरुवात केली. त्यातून जिल्हा परिषदेच्या मुरबाड येथील शाळेत प्रथमच संपूर्ण पटसंख्या भरली. मुरबाडप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाली असल्याचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती सुभाष पवार यांनी सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिक्षक हे देशाचे शिल्पकार आहेत. विविध आव्हानांना तोंड देवून सक्षम-सुजाण नागरिक निर्माण करण्याचे आव्हान शिक्षकासमोर असल्याचे त्या म्हणाल्या. तर विद्या शिर्के आणि रवींद्र तरे यांनी कार्यक्रमाचे खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.

 

पुरस्कार प्राप्त शिक्षक  

गिरीश नामदेव ठाकरे, जांभूळ शाळा, ता. कल्याण, चारुशिला किरण भामरे, आघाणवाडी शाळा, ता. अंबरनाथ, रमेश मंगल्या म्हसकर, वैजोळा, ता. भिवंडी, संजय गोविंद उंबरे, पाटगाव, ता. मुरबाड, प्रमोद भाऊ पाटोळे, वायाचापाडा, ता. शहापूर, मोहिनी पंडीत बागूल, मुळगाव, ता. अंबरनाथ, अंकूश नारायण ठाकरे, राहनाळ, ता. भिवंडी, नारायण घावट, भिसोळ, ता. कल्याण, डॉ. निळकंठ रामचंद्र व्यापारी, आंबेळे खु., ता. मुरबाड, भगवान दुंदा फर्डे, मुगाव, ता. शहापूर.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!