कल्याण : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) चार महिन्यांत तयार करण्यात येईल. तर येत्या ८-९ महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाबाबत खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आली. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत वातानुकुलित लोकल सुरू करण्याची आग्रही मागणी खासदार पाटील यांच्याकडून करण्यात आली.
रेल्वे प्रशासनातर्फे मुंबईत खासदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता, मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचे (एमआरव्हीसी) अध्यक्ष आर. एस. खुराना, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न खासदार कपिल पाटील यांनी मांडले. त्याचबरोबर कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा डीपीआर प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधले होते. यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून
कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम रेल्वे प्रशासनाकडून प्राधान्याने घेण्यात आले असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. येत्या चार महिन्यांत अहवाल आल्यानंतर, त्याचा अभ्यास करुन आठ ते नऊ महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. त्यात भूसंपादनाच्या कामाचाही समावेश असेल अशी माहिती देण्यात आली.
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन, पनवेल-दिवा-भिवंडी रोड-वसई रोड रेल्वेमार्गावर फेऱ्यांची संख्या वाढवावी, कल्याण-कसारा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या कामाला गती द्यावी, वासिंद येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला वेग द्यावा, आसनगाव रेल्वेस्थानकात कसाऱ्याच्या दिशेकडील पूल तयार करावा, खडवली ते वालकस-बेहरे दरम्यान नव्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांबरोबर विशेष बैठक घ्यावी, आटगाव-तानशेत मार्गावरील कळमगाव येथे नवा अंडरपास वा रुंदीकरण करावे, टिटवाळा-खडवली दरम्यान गुरवली स्थानक, बदलापूर-वांगणी दरम्यान चामटोली स्थानकाला मंजुरी द्यावी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आटगावपर्यंत लोकलसंख्या वाढवावी, लोकलमध्ये दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांविरोधात मोहीम राबवावी, चिखलोली रेल्वे स्थानकाचे काम वेगाने करावे, भावनगर-काकीनाडा एक्सप्रेसला भिवंडीत थांबा, लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम एक्सप्रेसला कल्याण येथे थांबा, डेक्कन क्वीन व इंटरसिटी एक्सप्रेसला कल्याणमध्ये थांबा द्यावा आदी मागण्या रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या. पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत वातानुकुलित लोकल सुरू करावी अशी आग्रही मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली. टिटवाळा रेल्वेस्थानकात पूल मंजूर करण्यात आला आहे. तर खडवली येथील फाटकामध्ये रेल्वे अंडरपासच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. टिटवाळा येथील पूलाचे लवकरच भूमिपूजन करण्याचे आश्वासन खासदार पाटील यांनी दिले. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारने ५० टक्के निधी देण्याचे जाहीर केले आहे. येत्या चार महिन्यांत अंतिम डीपीआर आल्यानंतर, नऊ महिन्यांत कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुरबाड रेल्वेमार्गाचे काम वेगाने पूर्ण होईल, अशी आशा खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली.