डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचे ५२, भाजपचे ४२ ,मनसेचे १०, कॉंग्रेसचे ४ तर राष्ट्रवादीचे २ नगरसेवक आहेत. मात्र विकास कामे सत्ताधाऱ्यांच्या प्रभागात होत असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामे रखडण्याचा डाव आहे. त्यामुळे मनसेने केडीएमसी आयुक्त भाजपच्या हातातील बाहुले असल्याचा आरोपात तथ्य असल्याचे मत कॉंग्रेस नगरसेविका दर्शना शेलार यांनी केला आहे.
दोन दिवसापूर्वी मनसेने डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी आयुक्त भाजपच्या हातातील बाहुले असल्याची टिका केली होती. हा आरोप तथ्य असल्याचे सांगत कॉंग्रेसचे चार, राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक पालिकेत असून या नगरसेवकांनी दिलेल्या विकासकामाची कोणतीही नस्ती महापालिकेत आयुक्त मंजुर करत नसल्याचा आरोप कॉंग्रेस नगरसेविका दर्शना शेलार यांनी केला. गेल्या चार वर्षात केवळ चार नस्तीच मंजुर झाल्याचे त्यांनी सांगितले. माजी नगरसेवक तथा डोंबिवली कॉंग्रेस ब्लॉक सदाशिव शेलार यांच्या पाठपुराव्याने व नगरसेविका दर्शना शेलार यांच्या नगरसेवक निधीतून प्रभाग क्रमांक ७३ या प्रभागातील इंदिरा नगर परिसरात गटार आणि पायवाट या कामाचे भूमीपूजन करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी डोंबिवली ओ.बी.सी.सेल अध्यक्ष अजय शेलार यासह किशोर तांबे, श्यामसुंदर टिळक,खाजा शेख, पंकज जाधव,राहुल पाठाडे,पुण्यदान सरोदे,शंकर अण्णा,मनोज जयस्वाल आदि उपस्थित होते. गेल्या चार वर्षापासून अनेक विकासकामांसाठी आयुक्तांकडे नगरसेवक निधीची मागणी करण्यात येत होती. या कामासंदर्भात त्यांना नस्ती देखील सादर करण्यात आल्या होत्या. मात्र एकही नस्ती महासभेत मंजूर करण्यात आली नाही.इतकेच नव्हे तर निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्र्यांनी सुचविलेल्या सर्व विकासकामांवर आयुक्तांनी शिक्कामोर्तब करून विकासकामांचे भूमीपूजनही केले. मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे नगरसेवकांनी दिलेल्या कामांसाठी नगरसेवक निधीसुध्दा मंजुर करण्यास आयुक्त आडकाठी आणतात. त्यामुळे गेल्या चार वर्षात केवळ चारच विकास कामांची नस्ती मंजुर करण्यात आल्याचे सांगत आयुक्त र्गोंवद बोडके हे नगरसेवकांची मुस्कटदाबी करत आहेत असा आरोपही नगरसेविका दर्शना शेलार यांनी केला. त्यामुळे आयुक्तांची नियुक्ती केंद्रशासनातर्फे झाली की भाजपतर्फे असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी नारळ वाढवून त्यांनी पायवाट आणि गटारांच्या कामाचा शुभारंभ केला असून एकुण १० लाखाचे काम मंजूर झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.