भारत महाराष्ट्र

उदयनराजेंचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; अमित शहा, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

 नवी दिल्ली ः छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वशंज व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आपला खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्याकडून लगेच तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजवरचा सर्वात मोठा भूकंप झाला असून, राष्ट्रवादीची सातारा जिल्ह्यात पडझड होणार आहे.

”राजे शिवछत्रपतींचा आदर्श व आशीर्वाद घेऊन आजपर्यंत रयतेसाठी काम करत राहिलो. हीच परंपरा यापुढे ही मोठ्या हिंमतीने चालवण्याची शक्ती आम्हास रयतेकडून मिळते, हीच प्रेमाची साथ व आशीर्वाद सदैव पाठीशी राहो हीच मनोमन इच्छा. तुमच्यासाठी कालही होतो, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत असेन..”असेही उदयनराजेंनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

काल, उदयनराजे पुणे विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन होते.

गेले अनेक दिवस उदयनराजे पक्षांतरामुळे चर्चेत होते. मात्र, तळ्यातमळ्यात त्यांची अवस्था होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते दोन वेळा भेटले. त्यानंतरही त्यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय होत नव्हता. उदयनराजे व भाजप यांच्यामध्ये अटी, शर्तींची चर्चाही सुरू होती. त्यानंतर उदयनराजेंनी शेवटचे धक्कातंत्र वापरत माधव बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार, उदयनराजे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आ. शशिकांत शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. पवारांना भेटत त्यांचे आशीर्वाद घेऊन उदयनराजे बाहेर पडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी त्यांचे फोनवर बोलणे झाले आणि दि. १४ सप्टेंबरचा मुहूर्त निघाला. धक्कातंत्रात माहीर असलेल्या उदयनराजेंनी शुक्रवारी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरीने थेट दिल्ली गाठली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!