डोंबिवली : राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर माध्यमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक सुनिल पांचाळ यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मुंबई विभागीय मंडळावर शिक्षण मंडळ सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्ताने सह्याद्री अतिथीगृहाच्या सभागृहात शिक्षण मंडळाच्या सर्वच सदस्यांसाठी स्वागत आणि शुभेच्छांचा समारंभ झाला.
शालेय व युवक क्रीडा मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पांचाळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी शासनाला शिक्षण मंडळाकडून काय अपेक्षित आहे याचे मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. पांचाळ यांनी शैक्षणिक क्षेत्रात पाठ्यपुस्तकाचे समीक्षक, चिकीत्सक, प्राश्निक, नियामक, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ संपादक, राज्य व विभाग स्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक अशा विविध पदांवर गेली वीस-बावीस वर्षे सातत्याने काम करत आहेत. मराठी विषय हा विषय म्हणून नव्हे तर भाषा म्हणून शिकवावा याच्या प्रचार व प्रसारासाठी पांचाळ हे महाराष्ट्रभर मराठी भाषेच्या शिक्षकांना अनेक कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. त्यांना नाट्यलेखन, काव्यलेखन, अभिनय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. मराठी अभाषिक विद्यार्थ्यांसाठी माझे मराठीची पुस्तकेही लिहीली आहेत. स्वामी विवेकनंद विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक भोजराज रायसिंग, तसेच पर्यवेक्षिका बोंडे, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी पांचाळ यांना शुभेच्छा दिल्या.
डोंबिवलीच्या शिक्षकांंचा सन्मान
