संयुक्त बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना
ठाणे दि. 23 (जिमाका) : पारदर्शी आणि निर्भय वातावरणात विधानसभा निवडणूक होण्यासाठी आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. तसेच जिल्ह्यातील सर्व निवडणूक यंत्रणानी समन्वयाने काम करावे अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील समिती सभागृहात सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे , निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, उप जिल्हाधिकारी श्री म्हस्के पाटील उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर म्हणाले, शासकीय कार्यालय, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेवर असणारे राजकीय फलक, होर्डिंग्ज काढून टाकावे. कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदार संघामध्ये तात्काळ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावे. भरारी पथक, स्थायी निगरानी पथक यांची निर्मिती करुन ती कार्यरत करावे. पोलीस अधिकाऱ्यांसोबत स्ट्रॉंग रुम, मतमोजणी केंद्र यांची तपासणी करावे. राजकीय पक्ष प्रमुखांना सर्पंक साधून सभा, बैठका तसेच स्पिकर परवान्या बाबत माहिती द्यावी. कर्मचारी आणि अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात यावे. मागील चुका टाळून योग्य उपाययोजना करण्यावर भर द्या. आदि सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात येत असून खर्च पथके, आचारसंहिता पथक, भरारी पथकांना पुरेसे प्रशिक्षण द्यावे. निवडणूक निरीक्षक प्रत्येक मतदारसंघ निहाय नेमण्यात आले आहेत. त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा, साधनसामग्री तसेच माहिती वेळेत देण्यात यावी.सर्व अहवाल वेळेत आणि अचुक पाठवावेत. उमेदवाराला साहित्यावर मुद्रक, प्रकाशक आणि प्रतींची संख्या छापने बंधनकारक आहे. त्यांचा छपाई परवानाही हवा. याबाबत योग्य मार्गदर्शन करावे असेही श्री नार्वेकर यांनी सांगितले. शिवाय मतदारसंघात कोणतेही घटना घडल्यास तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवावे तसेच माध्यमांमध्ये येणाऱ्या नकारात्मक बातमीचा तात्काळ खुलासा करावा.तसेच माध्यमांशी सुसंवाद साधावा असेही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मतदार जनजागृती कार्यक्रमाची (स्वीप ) देखील प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.
यंदाचा पावसाचा प्रमाण पहाता मतदान केंद्रावर त्यादृष्टीने उपाययोजना करावेत. शिवाय मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध असतील याची दक्षता घ्यावी. अधिकारी, कर्मचारी यांनी संयम आणि समन्वयाने काम करावे, असेही ते म्हणाले.
मतमोजणी केंद्राचे नियोजन आज पासून सुरू करण्याचे तसेच त्याठिकाणी सुरक्षेचे नियोजन करण्याचे सूचना त्यांनी दिल्या.. राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी देखिल लोकसभा निवडणुकीचे अनुभव यानिमित्ताने कथन केले.
