डोंबिवली ( शंकर जाधव ) पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आलॆ आहेत. त्यामुळे मंगळवार सकाळपासून पीएमसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. तसेच बँकेचे ऑनलाइन व्यवहारही बंद आहेत. सहा महिन्यातून एकदा एक हजार रुपये मिळत असल्याने डोंबिवलीतील वैतागलेल्या ग्राहकांनी पीएमसी बँकेच्या टाटा पॉवर शाखेसमोर गर्दी केली आणि एकच गोंधळ उडाला. ऐन सणाच्या काळात पंजाब आणि महाराष्ट्र को-ओप. बँकवर रिझर्व बँकेचे आर्थिक निर्बंध लावल्याने खातेदार संतप्त झाले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानुसार बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तर खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतील. मंगळवारी सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे चिंतीत झालेले ग्राहक बँकेत मोठ्या संख्येने जमले होते. कल्याण पश्चिमेत खडकपाडा, पूर्वेत मलंगडरोड, डोंबिवली पश्चिमेत शास्त्रीनगर आणि लोढा हेवन परिसरात पंजाब महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. निळजे गावासह आजूबाजूची खेडी आणि लोढा हेवन, कसा रिओ, पलावा यासारख्या उचभ्रू वसाहतीतील ग्राहक इथल्या शाखेशी जोडली आहेत. त्यामुळे खेड्यातील नागरीकांनी त्यांची आयुष्यभराची पुंजी तर पलावा सारख्या वसाहतीतील नागरिकांनी मोठ मोठ्या रकमेची ठेवी गुंतवणूक म्हणून ठेवल्या आहेत. त्यामुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांची बँकेत गर्दी होत आहे. परंतु या शाखेतून एक हजार रुपये देण्यात येत असल्याने ग्राहकांची पंचाईत झाली आहे. टाटा पॉवर शाखेशी १६ हजार खातेदार जोडलेले आहेत. २०१२ पासून ही शाखा कार्यरत असून सुमारे ६३ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या या बँकेत अवघे १३ कर्माची काम करतात. बँक बंद होणार अशी अफवा पसरताच बँकेशी संबंधित खातेदारांमध्ये खळबळ माजली. सकाळपासून या बँकेवर खातेदारांची बँकेत झुंबड उडाली.