आरोग्य सेवा नसतील तर रुग्णालयात कशाला सुरु ठेवले ?
संतप्त महिला रुग्णांची मनसेकडे तक्रार…
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार, खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आणि महापौर विनिता राणे ह्या परिचारिका असे असूनही पालीकेच्या रुग्णालयात आरोग्य सेवा वेटीलेटर आहे. आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून महिला रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यास नकार देत आहेत.महीला रुग्ण आणि नातेवाईकांनी मनसेकडे याबाबत तक्रारीचा पाढाच वाचला.त्यामुळे अनेक वर्ष पालिकेवर सत्ता असलेले शिवसेना –भाजपचेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप मनसेने यावेळी केला.
मनसे जिल्हाध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर, शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे, संजीव ताम्हाणे, शहर सचिव अरुण जांभळे,विभाग अध्यक्ष वेद पांडे, शाखा अध्यक्ष हर्ष देशमुख, उपविभाग अध्यक्ष विशाल बढे, प्रकाश थोरात, विकी चौधरी, अजय शेट्टी, अतुक आंब्रे, संजय म्हात्रे, सुरेश म्हात्रे, वर्गीस पाटील, हेमंत दाभोळकर, अश्विन पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मनसे नेते प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.यावेळी महिला रुग्णांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे या रुग्णालयात आरोग्य सेवा मिळत नाही. प्रंचड अस्वच्छता, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे होत असलेले दुर्लक्ष याबाबत तक्रारी केल्या. तसेच महिला प्रसूती विभागात मांजर फिरत असल्याने महिलांनी अनेक वेळेला याची तक्रार परिचारिकांना केली होती. मनसे पदाधिकाऱ्यांनी याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्र शेखर सावकारे यांची भेट घेऊन जाब विचारला. यावर डॉ. सावकारे यांनी रुग्णालयात डॉक्टर्स आणि परिचारिका यांची संख्या कमी असूनही शक्य तेवढे काम केले जाते. पालिका प्रशासनाने यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे असे सांगितले. तर मनसे जिल्हा अध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी या परिस्थितीला शिवसेना –भाजप जबाबदार असल्याचे सांगत अनेक वर्ष सत्ते असूनही नागरिकांना आरोग्यसेवा देऊ शकत नाही.गरीब रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात आरोग्य सेवा मिळावी म्हणून मनसे लक्ष देईल असे सांगीतले.