केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल
ठाणे दि २८ सप्टेंबर २०१९ : विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक निरिक्षकांनी दिलेल्या सुचनांचे संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. विवेकानंद हे १३४-भिवंडी, ग्रा. १३६ भिवंडी पश्चिम , १३७ भिवंडी पूर्व येथे काम पाहणार आहेत. तर श्री. आशिष चंद्र मोहंती हे – १३५ शहापूर ,१३८ कल्याण पश्चिम, १३९ मुरबाड. मतदार संघात काम पाहणार आहेत. तसेच श्री. एस आर कौशिक हे १४० अंबरनाथ, १४१-उल्हासनगर, १४२-कल्याण(पूर्व.) श्री. शिव स्वरूप सिंग – १४३-डोंबिवली, १४४ कल्याण ग्रामीण,१४८ ठाणे, या मतदार संघात काम पाहणार आहेत. आणि श्री. उमेश पाठक हे १४५ मीरा-भाईंदर, १४६ ओवळा-माजीवाडा, १४७ कोपरी- पाचपाखाडी, क्षेत्रात काम पाहणार आहेत. तर श्री. के रमेश हे १४९-मुंब्रा-कळवा, १५०-ऐरोली,१५१-बेलापूर या मतदार संघांमध्ये कार्यरत राहणार आहेत.
दरम्यान, आज निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेऊन काही महत्वपूर्ण सुचना दिल्या.सर्व पथकांनी उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची बाब खर्च अहवालात समाविष्ठ होईल याची दक्षता घेण्याच्या सुचना करण्यात आल्या. पोलीस, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच जिल्ह्यात नेमण्यात आलेले फ्लाईग स्कॉड, व्हीडीओ सर्व्हिलन्स टीम, स्थिर निगराणी पथके यांनी वाहनांची तपासणी करावी. निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सभा, बैठकांची माहिती घेऊन त्यानुसार पथकांची नेमणूक करावी.
विना परवानगी कुठलीही सभा, बैठका होणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच प्रचाराच्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सुचनांही त्यांनी यावेळी केल्यात.राजकीय पक्षाच्या व उमेदवाराच्या सभा आणि कॅार्नर सभाचे चित्रीकरण करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. व्हिडिओ पथक व भरारी पथकांना सक्रीय ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आयकर विभाग आणि लेखा विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन काम करावे. विविध मार्गाने येणाऱ्या मद्य वाहतूकीवर उत्पादन शुल्क विभागाने पायबंद घालावा, असे निर्देश देण्यात आले. विविध समिती प्रमुखांनी यावेळी समित्यांच्या कामाची माहिती दिली. या बैठकीला उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी तसेच समित्यांचे अधिकारी उपस्थित होते.