डोंबिवली ( शंकर जाधव ) सकाळच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अग्निशमन दलाच्या जवानाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे. अरुण सुर्वे यांचा जीव वाचविल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानाचे नागरिकांनी कौतुक केले.
डोंबिवली पश्चिम येथे राहणारे अरुण सुर्वे नेहमीप्रमाणे आज सकाळी डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली खाडीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र पोहत असताना अचानक त्यांना दम लागल्याने त्यांनी किनार्यावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र खाडी किनारी असलेल्या चीखलात ते रुतले यामुळे त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली . किनार्यावर उभ्या असलेल्या नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन सुधीर दुशिंग यांच्या नेतुत्वाखाली बबलू व्यापारी, मकानदार, पत्राळे, शितोळे, भोसले या अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. रिंगच्या मदतीने या जवानांनी सुर्वे यांना या दलदलीतून बाहेर काढले असता त्यांना पोह्तानाच अर्धांगवायूचा झटका आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे दुशिंग यांनी सांगितले.