ठाणे

अंबरनाथ नगरपरिषद आयोजित “इंडिया प्लॉग रन”ला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकसहभागातून ८ हजार किलो प्लास्टिक केले जमा
* आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी मतदानाची केली जनजागृती 

अंबरनाथ दि. ०२ (नवाज अब्दुलसत्तार वणू)   महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त “स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमे अंतर्गत प्लास्टिकच्या विरोधात अंबरनाथमध्ये चालत चालत प्लास्टिक गोळा करणाऱ्या “इंडिया प्लॉग रॅली”ला अंबरनाथकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या रॅलीचे आयोजन अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले होते.
           या मोहिमेमध्ये अंबरनाथ शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक, बचतगट, धार्मिक संस्था, शालेय विद्यार्थी, शिक्षक, लोकप्रतिनिधी आणि नगरपालिका  अधिकारी यांच्या उपस्थितीने अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौक गजबजून गेला होता. अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी लोकसहभागातून शहरातील प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी आज बुधवारी “इंडिया प्लॉग रॅली”चे आयोजन केले होते. अंबरनाथ शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा मनिषा  वाळेकर, आरोग्य सभापती उत्तम आयवळे, आरोग्याधिकारी सुरेश पाटील, सुहास सावंत, पालिका स्वच्छतादूत सलील जव्हेरी, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील,  नगरसेवक सचिन पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, उमेश पाटील, एड निखिल वाळेकर, भाजपा शहराध्यक्ष भरत फुलोरे, किसनराव तारमळे यांच्या उपस्थितीमध्ये इंडिया प्लॉग रनला  उत्साहात सुरुवात झाली.
           शहराच्या विविध ठिकाणांहून नागरिक आणि विद्यार्थ्यांनी जमा केलेले प्लास्टिक कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले, त्यानंतर जमा झालेले प्लास्टिक नगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकचे विघटन ठिकाणी आणले. शहरातील बहुतेक सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, आयटीआय, बचतगट, खाजगी क्लासचे विद्यार्थी महिला, पुरुष, परिसरातील दिव्यांग नागरिक मोठ्या संख्येने सकाळी सात वाजता हुतात्मा चौकात जमा झाले होते. त्याठिकाणी विविध संस्थांनी पथनाट्ये सादर करून प्लास्टिकला हद्दपार करण्याचे आवाहन केले. याशिवाय शहरातील विविध गृहनिर्माण संस्थांतील नागरिकांनी देखील सोसायटीचा परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. सकाळी ७ ते १० या तीन तासांत सुमारे ८ हजार किलो प्लास्टिक जमा झाले होते,
           तसेच अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौक येथे “इंडिया प्लॉग रन” या कार्यक्रमादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी नवीन भोपी (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथनाट्य सादर करून मतदानाची टक्केवारी वाढावी व जनतेने आपला मतदानाचा हक्क बजवावा याकरिता पथनाट्य सादर केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी कदम मॅडम, नायब तहसीलदार अडसुळे व भगवान बोरसे आदी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!