राष्ट्रपिता महात्मा गांधी जंयती निमित्त हिरालाल सोनवणे यांनी केले लोनाड वनराई बंधाऱ्यावर श्रमदान
ठाणे दि २ ऑक्टोबर २०१९ ( जि.प ) : जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या ५ हजार वनराई बंधारे बांधण्याच्या कामाला आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयतीचे औचित्य साधत सुरुवात करण्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी भिवंडी ग्रामपंचायत हद्दीतील वनराई बंधाऱ्याच्या ठिकाणी भेट देवून प्रत्यक्ष श्रमदान करून वनराई बंधारे बांधण्याचा वस्तुपाठ आपल्या कृतीमधून सर्वांना दिला.
यावेळी श्री. सोनवणे म्हणाले, वनराई बंधारा बांधल्यामुळे शेतकऱ्यांना फळबाग तसेच भाजीपाला पिकवण्यासाठी मुबलक पाण्याची व्यवस्था होईल. शिवाय पशु-पक्षांना देखिल पिण्यासाठी पाण्याची सोय होईल. गावकऱ्यांनी एकजुटीने गावागावात वनराई बंधारे बांधायला हवेत. लोकसहभागातून वनराई बंधारे ही लोकचळवळ झाली पाहिजे असेही प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) अशोक पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( स्वच्छता व पाणी ) छायादेवी शिसोदे उपस्थित होते.
आज दिवसभरात जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, शहापूर, भिवंडी, मुरबाड आदी तालुक्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याचे प्रत्यक्ष कामकाज करण्यात आले. प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या समन्वयातून या बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने यांनी कल्याण तालुक्यातील घोटसई या ठिकाणी भेट देवून वनराई बंधाऱ्याचे कामकाज पाहिले.
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मिशन मोडवर हा उपक्रम राबिवण्यात येणार आहे. यामध्ये प्रशासनातील विविध यंत्रणा, गावातील युवक, सेवाभावी संस्था तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थांचा सहभाग महत्वपूर्ण ठरणार आहे.