डोंबिवली : ( शंकर जाधव ) सामान्य मुलांसारखे जीवन जरी जगता आले नाही तरी किमान सण, उत्सवात सहभागी होण्याचा आनंद व्यक्त करण्याची संधी मिळावी म्हणून स्वमग्न विद्यार्थी वाट पाहत असतात.हि संधी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रासरंग नवरात्रोत्सवात देण्यात आली.डीएनसी मैदानात सुरु असलेल्या नवरात्रोत्सवात डोंबिवलीतील संतोष इन्स्टीट्युट फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन्स या शाळेचे एकुण ४० विद्यार्थी गरब्यामध्ये सहभागी झाले होते.यावेळी खासदार डॉ. शिंदे,महापौर विनिता राणे यांनी या मुलांबरोबर काही वेळ संवाद साधला. हा क्षण आठवणराहावा म्हणून या पालकांनी खासदार. डॉ.शिंदे बरोबर विद्यार्थ्यांचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढला.
रासरंग नवरात्रोत्सवात या विद्यार्थ्यांचे यंदाचे दुसरे वर्ष होते. यावर्षी या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात गरबा खेळल्याचे पालकांनी सांगितले. गेल्यावर्षी दोन ते तीन विद्यार्थी चालु शकत नव्हते. मात्र यावर्षी हे विद्यार्थी खुर्चीत बसून गरबा खेळत असल्याचे दिसले. स्वमग्न मुलांना गर्दी तसेच मोठ्या आवाजाची भिती वाटते. त्यामुळे ते गर्दीच्या ठिकाणी जास्तवेळ बसु शकत नाही. मात्र गरब्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्यांची ही भिती गेल्याचे पहावयास मिळत असल्याचे पालक मानसी पाटील यांनी सांगितले. ही मुले दिवा, कल्याण अशा विविध भागातून आले होते.शाळेचे संस्थापक दत्ताराम फोंडे म्हणाले, यांनी स्वमग्न विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आपलेसे करणे महत्त्वाचे आहे. त्यांना त्यांच्या आजुबाजुला आपल्यावर प्रेम करणारी माणसे आहेत, याची खात्री पटली की ही मुलेही सर्वसामान्याप्रमाणे आयुष्य जगु शकतात अशी माहिती दिली. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन पवार, शाळेच्या शिक्षिका वंदना रावराणे यांसह अनेक शिक्षकवर्ग आणि पालकवर्ग उपस्थित होते. रासरंग नवरात्रोत्सवात स्वमग्न विद्यार्थी गरबा खेळताना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.