मिरारोड येथील शांतीनगर सेक्टर ३ भागात भाजप नगरसेवक दिनेश जैन हे गेल्या पाच वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा करतात. या नवरात्र उत्सव कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे भाजपच्या नगरसेविका व माजी महापौर गीता जैन या मंडळाला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र तेथे गेल्यानंतर गीता जैन यांना कुठल्याही प्रकारचा सन्मान न दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होऊन वादाला सुरुवात झाली. वाद इतक्या प्रमाणात वाढला की भाजप पक्षातील नगरसेवक गीता जैन आणि दिनेश जैन यांच्यात आपआपसात वाद निर्माण होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. कार्यक्रमात घडलेल्या वादामुळे माजी महापौर गीता जैन व त्यांचे सहकारी कार्यकर्ते यांच्या विरोधात नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गीता जैन यांच्याबरोबर असलेल्या प्रमिला वाघमारे यांनीही दिनेश जैन व त्यांची पत्नी यांच्याविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. माजी महापौर गीता जैन यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.तर दिनेश जैन हे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांचे समर्थक आहेत. भाजपची अधिकृत उमेदवारी नरेंद्र मेहता यांनाच मिळाली आहे.
गीता जैन यांना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले नव्हते. तरीही त्या कार्यक्रमाला आल्या. कार्यक्रम सुरू असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी जैन यांचे स्वागत करण्यास सांगितले. तेव्हा मी त्यांना सांगितले की कार्यक्रम सुरू आहे. कार्यक्रमासाठी अगोदरच वेळ कमी आहे त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात येणार नाही. यावरून हा वाद झाला.
दिनेश जैन (भाजप नगरसेवक)
मला कार्यक्रमाचे निमंत्रण सार्वजनिक मंडळाच्या कमिटीत असलेल्या कार्यकर्त्यांनी दिले होते व कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला होता. म्हणून मी कार्यक्रमाला गेले होते. तेथे शाब्दिक वाद झाला. मात्र हाणामारी झालीच नाही. ते जाणून बुजून असे प्रकार करत आहेत.
गीता जैन (माजी महापौर, नगरसेविका)